Mumbai Local News: मध्य रेल्वेने कसारा स्थानकात घेण्यात आलेला महत्त्वपूर्ण ब्लॉकचे काम आता पूर्ण झाले आहे. ज्यामुळं घाटातून जाणाऱ्या ट्रेनमधील अडथळा आता कमी होणार आहे. या ब्लॉकदरम्यान प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 2चा विस्तार आणि चौपदरीकरण तसंच, मालगाडीसाठी वेगळी रेल्वे लाइन तयार करण्यात आली आहे. ज्यामुळं मालगाडी आणि लोकलची वाहतूक सुरळित होणार आहे.
रविवारी साधारण 3च्या सुमारास ब्लॉकच्या कामाला सुरुवात झाली होती. प्लॅटफॉर्म 1 आणि 2च्या रुंदीकरण 480 मीटरपर्यंत होता तो आता वाढवून 600 मीटरपर्यंत करण्यात आला आहे. ज्यामुळं लांब पल्ल्याच्या ट्रेनसाठी खूप फायदेशीर होईल. प्लॅटफॉर्म रुंदीकरणाचे काम करण्यात आले आहेत. जेणेकरुन प्रवाशांना अधिक सहज प्रवास करता येईल. डाऊन यार्डमध्ये तीन रेल्वे मार्गाचा विस्तार करण्यात आला आहे. ज्यामुळं मालगाड्यांचे इंजिन आणि लांब पल्ल्याच्या ट्रानसाठी पुरेशी जागा उपलब्ध होऊ शकेल. यामुळं ट्रेनचे डब्बे मुख्य रेल्वे मार्गिकेवर येणार नाहीत. ज्यामुळं कसारा स्थानकात येणाऱ्या लोकलला काही अडथळा येणार नाही.
या ब्लॉकचे काम झाल्यानंतर कसारा आणि कल्याणदरम्यान तिसऱ्या मार्गिकेचे काम करण्यासाठी रेल्वेला आता जागा मिळाली आहे. ही तिसरी लाइन 67 किमी लांब असून 793 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहेत. ही लाईन मुंबई डिव्हिजनची सर्वात लांब लाईन आहे. या लाईनचं ५० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झालं आहे.
तिसऱ्या मार्गिकेचा उद्देश एक्स्प्रेस ट्रेनवरील भार कमी करुन लोकलच्या फेऱ्या वाढवणे हा आहे. सध्या 147 लोकल आणि 71 लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस, 20 मालगाडी या दोन मार्गिकेवर धावतात. त्यामुळं बऱ्याचदा वाहतुक खोळंबते. तिसऱ्या मार्गिकेचे काम सुरू झाल्यानंतर ही गर्दी कमी होणार आहे.
कसारा ब्लॉकमुळं आठ लोकल रद्द करण्यात आल्या होत्या. 22 ट्रेन काही स्थानकापर्यंत धावत होत्या. 25 मेल एक्सप्रेस ट्रेनचा मार्ग बदलण्यात आला होता. तर, सहा ट्रेन पूर्णपणे रद्द करण्यात आल्या होत्या.