मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक घोटाळाप्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आक्रमक झाले आहेत. मुंबईच्या ईडी कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं आहे. तसंच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ईडीच्या कार्यालयाबाहेर घोषणाबाजीही केली. अखेर पोलिसांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.
शरद पवार यांच्यावरच्या कारवाईला विरोध म्हणून आज बारामती बंदची हाक देण्यात आली होती. या बारामती बंदला उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
मी कुठल्याही बँकेचा संचालक नव्हतो, माझ्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याबद्दल मला माहिती नाही, तसंच राष्ट्रवादीला प्रचंड प्रतिसाद मिळतोय. तो पाहूनच असं घडेल अशी शंका मला होतीच, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी झी २४ तासशी बोलताना दिली आहे.
तर दुसरीकडे पवारांवर दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत आपल्याकडे फारशी माहिती नाही, संपूर्ण माहिती घेऊनच प्रतिक्रिया देऊ असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तपशील जाणून घेतल्याशिवाय बोलणं योग्य होणार नाही असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं.
शरद पवारांचा संबंध नसताना त्यांचं नाव कसं घेण्यात आलं ते कळत नाही. पवार संचालक नाहीत, सभासद नाही तरी त्यांचे नाव गोवण्यात आल्याचा आरोप अजित पवार यांनी केला आहे.
राज्य सहकारी बँकेत एक पैशाचा गैरव्यवहार केला नसल्याची प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली. बँकेचा व्यवहार १२ हजार कोटींचा असताना गैरव्यवहार २५ हजार कोटींचा कसा असा सवाल त्यांनी विचारलाय. आज बँक २५० ते ३०० कोटींच्या नफ्यात आहे. जर बँक चांगली चालली नसती तर नफा मिळवला नसता अशीही प्रतिक्रिया त्यांनी दिलीय. आमचं म्हणणं मांडायला संधी न देता एफआयआर दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले, त्यानंतर ईडीने ही कारवाई केल्याचं अजित पवार म्हणाले.