Mumbai Crime : वांद्रे (Bandra) येथील एका लोकप्रिय रेस्टॉरंटच्या व्यवस्थापक आणि दोन स्वयंपाकींना एका ग्राहकाने त्याच्या ताटात उंदीर (Rat) आढळल्याची तक्रार केल्यानंतर अटक करण्यात आली. ताटामध्ये उंदीर सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. 13 ऑगस्टच्या रात्री एका ग्राहकाने अन्नात मेलेला उंदीर असल्याची तक्रार केल्यानंतर वांद्रे (Bandra Police) येथील या लोकप्रिय रेस्टॉरंटचे व्यवस्थापकसह दोघांना अटक करण्यात आली. याप्रकरणी सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
वांद्रे पोलीस ठाण्याच्या कर्मचार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी, दिंडोशी परिसरातील रहिवासी अनुराग दिलीप सिंग (40) हे गोरेगाव पश्चिम येथील एका खाजगी बँकेतील वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून काम करतात. 13 ऑगस्ट रोजी ते वांद्रे येथील पापा पांचो दा ढाबा रेस्टॉरंटमध्ये गेले होते. त्यावेळी जेवणासाठी त्यांच्यासोबत त्यांचा मित्र अमीन खान (40) देखील होते. वांद्रे येथे दिवसभर खरेदी केल्यानंतर रविवारी रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी ऑर्डर केलेल्या चिकन डिशमध्ये उंदराचे पिल्लू आढळलून आले. सुरुवातीला हे त्यांच्या लक्षात आले नाही आणि तो कोंबडी मांसाचा तुकडा आहे असे वाटल्याने त्यांनी त्यातील काही भाग खाऊन देखील टाकला. मात्र त्यानंतर जवळून पाहिल्यावर त्याच्या लक्षात आले की तो उंदीर आहे.
"बांद्रा येथे खरेदी केल्यानंतर, आम्ही जेवणासाठी रेस्टॉरंटमध्ये थांबलो. मी ऑर्डर केलेल्या चिकन करीमध्ये मांसाचा तुकडा जास्त हलका दिसत होता. जेव्हा मी ते चमच्याने बाहेर काढले तेव्हा तो लहान उंदीर असल्याचे दिसून आले," असे सिंग म्हणाले. "आम्ही याची कर्मचाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी माफी मागितली. पण त्यानंतर पुढील 45 मिनिटे होऊन सुद्धा व्यवस्थापक पुढे आला नाही. ताटात उंदीर सापडल्यानंतर मला कसेतरी वाटू लागले कारण त्याचा काही भाग आधीच खाल्ला होता. घरी परतताना आम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतला. डॉक्टरांनी काही औषधे लिहून दिली आहेत," असेही अनुराग सिंग म्हणाले.
त्यानंतर दोघांनी हॉटेल मॅनेजर व्हिव्हियन अल्बर्ट सिक्वेरा (40) यांना फोन करुन बोलावून घेतले आणि त्यांना ताटातील उंदीर दाखवला. त्यावेळी व्यवस्थापक व्हिव्हियन अल्बर्ट सिक्वेरा समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. त्यानंतर अनुराग सिंग यांनी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली. त्यानंतर वांद्रे पोलिसांनी सिक्वेरा आणि दोन कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. तिघांवर भारतीय दंड संहिते कलम 272 आणि 336 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर तिघांची जामिनावर सुटका करण्यात आली. पोलिसांनी आता दुकानांत मांस पोहचवणाऱ्याचा शोध घेत आहेत.
रेस्टॉरंटने दिलं स्पष्टीकरण
"आमचे रेस्टॉरंट खूप जुने आहे आणि गेल्या 22 वर्षांत अशी कोणतीही घटना घडली नव्हती. राजस्थानचे असलेले हे दोन्ही ग्राहक त्यादिवशी खूप मद्यधुंद अवस्थेत होते. त्यादिवशी आम्ही त्यांना दारु न दिल्याने त्यांनी आक्षेप घेतला. रेस्टॉरंटमधून पैसे उकळण्यासाठी त्यांनी हे जाणूनबुजून केले आहे, असे आम्हाला वाटते. अनेक कर्मचार्यांकडून जेवणाची तपासणी केली जाते आणि त्यामुळे असे कधीही होणार नाही, असेही ठामपणे सांगतो," असे व्यवस्थापक सिक्वेरा म्हणाले.