बेस्ट चालकाच्या पत्नीला Instagramवरील मित्राने पाठवलेलं गिफ्ट पडलं महागात; थेट गाठावं लागलं पोलीस ठाणे

Online Fraud : इन्स्टाग्रामवर या महिलेची एका व्यक्तीसोबत ओळख झाली होती. त्यांनतर काही दिवसांनी या व्यक्तीने तुला एक गिफ्ट पाठवलंय असे सांगितले.

Updated: Nov 27, 2022, 09:35 AM IST
बेस्ट चालकाच्या पत्नीला Instagramवरील मित्राने पाठवलेलं गिफ्ट पडलं महागात; थेट गाठावं लागलं पोलीस ठाणे title=
(फोटो सौजन्य - Reuters)

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून ऑनलाईन फसवणूकीच्या (online fraud) घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. सायबर गुन्हेगार (cyber crime) आता सामान्यांनाही लक्ष्य करताना दिसत आहे. फोन करून किंवा ई-मेल पाठवून हे सायबर गुन्हेगार लोकांना आपल्या जाळ्यात ओढत आहेत. गिफ्टच्या आमिषाने लोकही या गुन्हेगारांना बळी पडत आहेत. अशातच मुंबईत एका महिलेला तब्बल 7.5 लाखांना ऑनलाईन गंडा घातल्याचा प्रकार समोर आलाय. इन्स्टाग्रामवरुन (instagram) ही फसवणूक सुरु झाल्याचे समोर आले आहे.

बेस्ट बस ड्रायव्हरची पत्नी असलेल्या 42 वर्षीय महिलेला इंस्टाग्रामवर भेटलेल्या तिच्या अमेरिकन मित्राने 7.5 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. चुनाभट्टी येथील रहिवासी असलेल्या महिलेने काही दिवसांपूर्वी पोलिसांना याची माहिती दिली. गृहिणी असलेल्या या महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी एका महिलेसह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले की, 22 सप्टेंबर रोजी या महिलेची इंस्टाग्रामवर 'इग्नेशियस एनवेन' नावाची व्यक्ती भेटली आणि दोघांची मैत्री झाली. एनवेनने महिलेला सांगितले की तो अमेरिकेचा नागरिक आहे आणि त्याचा स्वतःचा व्यवसाय आहे. त्यानंतर दोघं नियमित गप्पा मारत होते. त्यानंतर 25 सप्टेंबर रोजी त्याने तिला गिफ्ट पाठवत असल्याचे सांगितले. महिलेने भेटवस्तू स्वीकारण्यास नकार दिला असता पण एनवेनने तिला सांगितले की ते आधीच पाठवले आहे. पाच दिवसांनंतर 27 सप्टेंबर रोजी तिला दुसर्‍या एका महिलेचा दिल्ली कस्टम्समधून बोलत आहे असा फोन केला.

या महिलेने फसवणूक झालेल्या महिलेला सांगितले की दिल्ली विमानतळावर तिच्यासाठी भेटवस्तू आली होती आणि त्यात 30,000 डॉलर होते (सुमारे 24 लाख रुपये). महिलेने मात्र गिफ्टसाठी कस्टम ड्युटी भरावी लागणार असल्याचे सांगितले. त्यानंतर काही कालावधीत महिलेने पैसे भरले.

महिलेने दिल्ली कस्टममधून बोलतेय असा दावा करणाऱ्या महिलेला 7.5 लाख रुपये देऊन महिना उलटला तरी भेट न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर तिने पतीला याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांत या प्रकरणी तक्रार करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले, "ही मोडस ऑपरेंडी अनेक वर्षांपासून सायबर गुन्हेगार वापरत आहेत. आम्ही याबद्दल अनेक जनजागृती मोहिमा राबवतो पण लोक या फसवणुकीला बळी पडतात."