मुंबई : उतर प्रदेशातील लखीमपूर खीरी घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षांनी आज राज्यव्यापी बंदची हाक दिली. या बंदला जनतेने चांगला प्रतिसाद दिल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. याबद्दल त्यांनी जनतेचे आभारही मानले आहेत. त्याचबरोबर नाना पटोले यांनी भाजपवर जोरदार निशाणाही साधला.
शेतकऱ्यांच्या हत्येचं भाजप समर्थन करत असेल तर ते निषेधार्ह आहे, भाजपने या बंदला विरोधा केला, त्याचा निषेध व्यक्त करतो, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. उत्तर प्रदेश भाजपच्या प्रमुखांनी त्या हत्येबद्दल जिंता व्यक्त केली, पण राज्यातील भाजपचे लोक काही बोलले नाहीत. भाजपचे लोक रस्त्यावर उरतले नाहीत, त्यामुळे त्यांना बंद यशस्वी झाल्याचं दिसलं नाही, अशी टीकाही नाना पटोले यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या हत्याऱ्यांना हा ढोंगीपणा वाटेल, भाजपाच्या लेखी शेतकऱ्यांच्या बाजूने जो बोलेल तो ढोंगी, अतिरेकी असतो अशी टीकाही त्यांनी केली.
जेव्हा जेव्हा नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा केंद्राने तात्काळ पथक पाठवून निधी दिला पाहिजे, गेल्या वर्षी झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्राचं पथक आता राज्यात आलं, पण आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, वेळ पडली तर शेतकऱ्यांसाठी कर्ज काढण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
मुंबईत बेस्ट बसेसच्या तोडफोडीच्या घटनांवर बोलताना ज्या तुरळक चुकीच्या घटना झाल्या असतील त्याचं आम्ही समर्थन करत नाही, असं सांगत नाना पटोले यांनी राजभवनावर आम्ही गांधींच्या मार्गाने मौन आंदोलन केल्याचं त्यांनी म्हटलं. आज सरकारचा बंद नव्हता, हे पक्षीय आंदोलन होतं, त्यामुळे सरकारने या बंदला पाठिंबा दिल्याचा विरोधी पक्षांचा आरोप निराधार असल्याचंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता पडणवीस यांनी आज वसुली चालू आहे की बंद? असं ट्विट करत महाविकास आघाडी सरकारवर टीका केली होती. यावर बोलताना नाना पटोले यांनी वसुलीत कोण पुढे आहे, देशपातळीवर आणि राज्यात मागील काळात भाजपच्या सरकारमध्ये ते सर्वांना माहित आहे, वसुली व्यवस्थेची जाणीव त्यांना जास्त असेल असं प्रत्युत्तर दिलं.