मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली आज दिल्लीत नीती आयोगाची सातवी बैठक पार पडली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या सह सर्व राज्यांचे मुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित होते. पण या बैठकीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना योग्य स्थान दिलं गेलं नसल्याचं सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
आमदार रोहित पवार यांनी दिल्लीत आज झालेल्या नीती आयोगाच्या बैठकीचा एक फोटो ट्विट केलाय. यामध्ये या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना शेवटच्या रांगेत स्थान दिल्याबद्दल रोहित पवार यांनी नाराजी व्यक्त केलीय. आपल्या ट्विटमध्ये रोहित पवार यांनी म्हटलंय,
'एकनाथ शिंदे साहेब मोठे नेते आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचं इंजिन असलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. तरीही त्यांना शेवटच्या रांगेत स्थान देणं योग्य नाही. प्रत्येक #मराठी मनाला यामुळं नक्कीच दुःख झालंय. यापुढं असं होणार नाही याची दक्षता केंद्र सरकार घेईल, अशी अपेक्षा करूयात', असं रोहित पवार यांनी म्हटलंय.
भाजपचं उत्तर
रोहित पवार यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर भाजपने उत्तर दिलं आहे. राष्ट्रपती संबोधित करत असताना एकनाथ शिंदे पहिल्या रांगेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याजवळ होते. त्यावर रोहित पवार काही बोलले नाही, पण शेवटच्या रांगेवरुन टीका केली जात आहे, हे योग्य नाही असं भाजप नेते राम कदम यांनी म्हटलं आहे. सत्तेत नसल्याचं दु:ख बाहेर येत असल्याचा टोलाही राम कदम यांनी लगावला आहे.