मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता स्थापनेसाठी भाजपबरोबर कधीच चर्चा केली नसल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. शिवसेनेला दूर ठेवून आपण सरकार बनवू असं प्रपोजल भाजपनेच आणल्याचं पवारांनी म्हटलं आहे. तसेच महाविकासआघाडीचं सरकार पाच वर्षे चालेल असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
'मुख्यमंत्री झाल्यानंतर हे लोकांना माहित झाले. त्याआधी विरोधी पक्षातले ते आमदार म्हणून ओळखले जात होते. राज्यात किंवा देशाच्या नेतृत्वासोबत निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना होता असं मला वाटत नाही. माझी आधीपासून इच्छा होती की, सेनेने भाजप सोबत जावू नये म्हणून मी जाणीवपूर्वक विधान केलं होतं की, आम्ही बाहेरुन पाठिंबा देऊ. पण तसे झाले नाही. त्यांनी 5 वर्ष सरकार चालवलं. भाजपच्या हातात सरकार चालू देणं सेनेसाठी हिताचं नव्हतं.' असं देखील पवारांनी म्हटलं आहे.
'आम्हाला शिवसेनेला सोबत घ्यायचं नाही. तुम्ही आम्हाला साथ द्या असे काही भाजपचे नेते आमच्या नेत्यांसोबत बोलले. त्यांची इच्छा होती की, माझे आणि पंतप्रधानांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे पंतप्रधानांनी यात हस्तक्षेप करावा आणि मी त्याला संमती द्यावी आणि म्हणून माझ्या कानावरसुद्धा हा निरोप आला.'
शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचे सर्व आरोप साफ फेटाळून लावले. भाजपबरोबर सत्ता स्थापनेबाबत आम्ही कधीच चर्चा केली नाही. हे प्रपोजल घेऊन भाजपचे नेतेच अनेकदा चर्चेला आले होते. असं पवारांनी म्हटलं आहे.