देवेंद्र फडणवीस नाही तर गृहमंत्री पदासाठी या नेत्याचं नाव चर्चेत

महाराष्ट्रात लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून गृहखातं कोणाला मिळणार याबाबत चर्चा आहे.

Updated: Jul 9, 2022, 04:26 PM IST
देवेंद्र फडणवीस नाही तर गृहमंत्री पदासाठी या नेत्याचं नाव चर्चेत title=

मुंबई : महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी रात्री दोघांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. गृहमंत्री पद (Home Minister of maharashtra) कोणाला मिळणार यावरही बैठकीत चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे गृहमंत्रीपद स्वत:कडेच ठेवतील अशी आधी चर्चा होती. पण आता चंद्रकांत पाटील यांचं नाव देखील गृहमंत्रीपदासाठी चर्चेत असल्याचं समोर येतंय. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना गृहखातं त्यांनी स्वत:कडेच ठेवलं होतं. आता फडणवीसांच्या जागी चंद्रकांत पाटील यांना हे खातं मिळण्याची शक्यता आहे. 

गृहखाते आणि अर्थखाते भाजपकडे राहण्याची शक्यता आहे. लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या दोन्ही नेत्यांच्या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तार आणि विभागांचे विभाजन निश्चित करण्यात आले आहे. 

एकनाथ शिंदे गटाला 13 मंत्रीपदे मिळण्याची शक्यता आहे. तर बाकीचे मंत्रीपद भाजपला मिळणार आहेत. शिंदे-फडणवीस आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला निश्चित झालाय. सोमवारी सकाळी नव्या मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे.

शिवसेनेचे 40 आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर महाविकासआघाडीचं सरकार कोसळलं आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला. 40 शिवसेनेचे आणि 10 अपक्ष आमदारांच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत नवीन सरकार स्थापन केलं.