पावसाच्या हजेरीनंतर मुंबईकरांसाठी पालिका प्रशासनाची खुशखबर

मुंबई नजिकच्या सात तलावांमध्ये एकूण ७ लाख ४३ हजार ५३१ दशलक्ष लिटर इतक्या पाणीसाठ्याची नोंद

Updated: Jul 19, 2019, 08:02 PM IST
पावसाच्या हजेरीनंतर मुंबईकरांसाठी पालिका प्रशासनाची खुशखबर title=

मुंबई : मुंबईकरांसाठी एक खुशखबर आहे. मुंबई शहरात लागू असलेली दहा टक्के पाणी कपात आता मागे घेण्यात आली आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही तलाव क्षेत्रांत चांगला पाऊस पडत असल्याने तलावांमध्ये ५१ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. त्यानंतरही पाणी कपात रद्द केली जात नव्हती. मात्र नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांनी दिलेल्या पत्रानंतर एकाच दिवसात पाणीकपात रद्द करण्यात आल्याची घोषणा पालिका प्रशासनाने केली. मागील वर्षी नोव्हेंबरपासून मुंबईमध्ये दहा टक्के पाणी कपात सुरु करण्यात आली होती. 

मुंबईत गेल्या वर्षी परतीचा पाऊस न आल्याने मुंबईवर पाणीसंकट उभे राहिले. त्यामुळे गेल्या नोव्हेंबरपासून मुंबईकरांवर १० टक्के पाणी कपात लागू करण्यात आली होती. ही पाणीकपात आजही लागू आहे. त्यात समाधानाची बाब म्हणजे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुलशी या सातही तलाव क्षेत्रात पाऊस समाधानकारक पडत असल्याने पाण्याच्या पातळीत गेल्या काही दिवसात चांगलीच वाढ झाली आहे.  

पाणीसाठ्याची नोंद... 

अप्पर वैतरणा - २२ हजार ७६५ 

मोडक सागर - १ लाख ६ हजार १२४ 

तानसा - १ लाख १५ हजार ४५६

मध्य वैतरणा - १ लाख ३७ हजार ५०६

भातसा - ३ लक्ष ३७ हजार ५२१

विहारा - १६ हजार १२२

तुळशी तला व - ८ हजार ४६

अशा सात तलावांमध्ये एकूण ७ लाख ४३ हजार ५३१ दशलक्ष लिटर इतक्या पाणीसाठ्याची नोंद झाली आहे. तसेच तुलशी तलाव १२ जुलै रोजी सायंकाळी ७.०० वाजल्यापासून भरून वाहू लागला आहे. तलाव क्षेत्रात असाच पाऊस पडत राहिल्यास येत्या महिनाभरात मुंबईकरांना लागणारा वर्षभराचा पाणीसाठा तलावात जमा होईल, अशी अपेक्षा पालिकेकडून वर्तवण्यात आली आहे.