२४ तासांत पावसाची रेकॉर्डब्रेक कामगिरी, मुंबापुरीची मात्र दाणादाण

मुंबईला पाणीपुरवठा करणारा पवई तलाव ओसंडून वाहू लागलाय. साधारणपणे १९५ फुटांपेक्षा जास्त पाणी या तलावात साचलंय

Updated: Jul 2, 2019, 06:59 PM IST
२४ तासांत पावसाची रेकॉर्डब्रेक कामगिरी, मुंबापुरीची मात्र दाणादाण  title=

मुंबई : उशीरा आला मात्र मुसळधार बरसलेल्या पावसाने रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे. मुंबईत जुलैमधील ४४ वर्षांतील सर्वाधिक पाऊस सोमवारी रात्री पडलाय. २४ तासांत रेकॉर्डब्रेक पावसाची नोंद झालीय. दिंडोशी परिसरात सर्वाधिक ४८१ मिमी पावसाची नोंद झालीय. दरम्यान, मुंबईत पुन्हा मुसळधार पाऊस बरसणार असल्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केलीय. पुढच्या ४८ तासांत मुंबई शहर, उपनगर आणि उत्तर कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय तर विदर्भातल्या काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा वेधशाळेनं दिलाय. मुंबईत दोन दिवस पडणारा पाऊस मुंबईकरांसाठी गुड न्यूज घेऊन आलाय. मुंबईला पाणीपुरवठा करणारा पवई तलाव ओसंडून वाहू लागलाय. साधारणपणे १९५ फुटांपेक्षा जास्त पाणी या तलावात साचलंय.

मुसळधार पावसामुळे मुंबईची पुरती दैना झालीय. शुक्रवार पासून कोसळत असलेल्या पावसामुळे मुंबईची तुंबई झालीय. या वेळी कुर्ला क्रांती नगर हा मिठी नदी शेजारी असलेल्या विभागात भारतीय नौदलाच्या जवानांनी मदतीचा हात नागरिकांना देऊ केला. काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे या ठिकाणी रात्री मोठ्या प्रमाणत पाणी भरलं. त्यामुळे एक हजार पेक्षा जास्त नागरिकांना पालिका प्रशासन, एनडीआरएफ आणि नेव्हीच्या जवानांनी सुरक्षित ठिकाणी हलविलं. आयएनएस तानाजी आणि मटेरियल ऑर्गनायझेशनचे दहा जवान त्यांच्या हलक्या बोट, लाईफ जॅकेट घेऊन या रेस्क्यू ऑपरेशन मध्ये उतरले होते. पहाटे हे ऑपरेशन संपवून हे जवान पुन्हा आपल्या ठिकाणी रवाना झाले. मात्र दर वर्षी या ठिकाणी हीच परिस्थिती असल्याने इथल्या रहिवाश्यांना कायमस्वरूपी घरे देऊन त्यांचा हा प्रश्न सोडविण्याची मागणी इथले नागरिक करत आहेत. 

 

दमदार पावसानं उडवली मुंबईची दाणादाण

सायन पाण्यात

नेहमी पाऊस येतो आणि नेहमी सायन स्थानक पाण्याखाली जातं. तसंच मंगळवारीही गेलं. सायनमध्ये रुळ नव्हे तर तलाव दिसत होता. मुंबईचा सखल भाग असलेल्या सायनमध्ये मंगळवारीही पाणी साचलं. सायनच्या वस्त्य़ावस्त्यांमध्ये पाणी साचलं.

मध्य रेल्वेची बोंब

मध्य रेल्वेवरच्या माटुंगा स्थानकाचीही तीच अवस्था होती... ट्रेन सुरू झाल्यावरही रखडमपट्टीमुळे रुळांमधून चालतच जावं लागत होतं. कुर्ला स्थानकामध्येही रुळ तळ्यात बुडले होते. तळ्यातून मार्ग काढत, गुडघाभर पाण्यातून मार्ग काढावा लागत होता. कल्याण रेल्वे स्थानकावर बरीच गर्दी झाली. लांब पल्ल्याच्या अनेक लोकल्स स्थगित केल्यानं कल्याण स्थानकावर प्रवाशांची गर्दी झाली

बदलापूर स्थानकावर तुरळक गर्दी होती. लोकल्सची सोमवारची अवस्था पाहता मंगळवारी रेल्वे स्थानकावर जाण्याची हिंमतच लोकांनी केली नाही.

सीएसएमटीकडून तब्बल १२ तासांनी लोकल ठाण्याच्या दिशेनं रवाना झाली. दुपारी तीनच्या सुमाराला अखेर मध्य रेल्वे हळूहळू रुळांवर आली.

स्थानकांवर गर्दी

विरार-वसईकडून चर्चगेटच्या दिशेनं येणाऱ्या लोकल्स सकाळी ठप्प होत्या, इंडिकेटर्स बंद, कुठल्याही सूचना नाही, त्यामुळे रेल्वे स्थानकावर गर्दी झाली होती. शेवटी त्यातले बहुतांश लोक घराकडे परतले

वाहनं पाण्यात

मुंबईचे सगळे मुख्य रस्ते पाण्याखाली गेले. पूर्व द्रुतगती, पश्चिम द्रुतगती मार्गासह सारं काही पाण्यात गेलं. वाहनांच्या होड्या झाल्या.

नवाब मलिकांच्या घरात पाणी

कुर्ल्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या घरातही पाणी भरलं. नवाब मलिक कुर्ल्यामध्ये राहतात, त्यांच्या घराचं तळं झालं होतं. 

पाण्यात अनेकांचं नुकसान

गोरेगाव पूर्वेत सखल भागातल्या घरांमध्ये पाणी घुसलं. घरातल्या वस्तू अक्षरशः तरंगत होत्या. अनेक घरांमध्ये मोठं नुकसान झालं. वांद्र्याच्या गव्हर्नमेंट कॉलनी अर्थात शासकीय वसाहतीतही मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. गुडघ्याच्या वर पाणी होतं. पुढच्या पावसाळ्यापर्यंत इथल्या लोकांना स्विमिंगचा सराव करावा लागणार आहे.

नवी मुंबईतल्या पबनवेलमध्येही घरांमध्ये पाणी घुसलं... डुंगी गावातल्या बऱ्याचशा वस्त्यांमध्ये पाणी घुसल्यानं पाण्यातूनच मार्ग काढावा लागत होता.

पोलीस स्टेशनही पाण्यात

अंधेरीजवळच्या साकीनाका पोलीस स्थानकामध्येही पाणी घुसलं. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांचे हाल झाले.

कुर्ला नेहरु नगर पोलीस ठाण्यात सुमारे १ ते २ फूट पाणी साचलं. रात्रपाळी काम करणारे पोलिस अधिकारी आणि कर्मचारी घरी जाऊ शकले नाही तर पावसामुळे रेल्वे वाहतूक ठप्प असल्याने काही जण कामावर येऊ शकले नाहीत.

वाकोला पोलीस स्थानकातही पाणी घुसलं... पोलीस स्थानकात पाणी घुसल्यानं पोलीस स्थानकाचं प्रचंड नुकसान झालंय.

एनडीआरएफ आणि नेव्हीची मदत

विक्रोळीमधल्या सखल भागांतही प्रचंड पाणी साचलं... तुंबलेल्या पाण्यातून लोकांना मार्ग काढावा लागत होता. मिठी नदीशेजारी असलेला परिसर रिकामा करण्यात आला. रात्री मोठ्या प्रमाणात पाणी भरल्याने एक हजार पेक्षा जास्त नागरिकांना पालिका प्रशासन, एनडीआरएफ आणि नेव्हीच्या जवानांनी सुरक्षित ठिकाणी हलवलं. 

दुपारनंतर पाऊस कमी झाला

पावसानं नाईट शिफ्ट केली आणि मुंबईकरांनी दांडी मारली. सकाळी पावसानं दाणादाण उडवली. पण समुद्रात भरती बाराच्या सुमाराला आली. तोपर्यंत पाऊस थांबला होता. त्यामुळे पुढचा अनर्थ टळला आणि दुपारनंतर पाऊस मुंबईकरांना टाटा बायबाय करुन गुडूप झाला...