मुंबई : आकांक्षापुढती गगन ठेंगणे या उक्तीला साजेसं उदाहरण मुलुंडमध्ये समोर आलंय. बाबू जगजीवनराम नगर परिसरातील चाळीत हलाखीचं जीणं जगणा-या रिक्षाचालक आणि त्यांच्या लेकीनं कौतुकास्पद असं यश मिळवलंय. रिक्षाचालक असणा-या शरीफ खान यांनी दिवसातून 8 ते 9 तास रिक्षा चालवून दहावीची परीक्षा दिली आणि त्यात 51 टक्के गुण मिळवलेत.
1992 च्या मुंबईतील दंगलीच्या काळात शरीफ खान यांना घरच्या परिस्थितीमुळे आपलं शिक्षण अर्धवट सोडावं लागलं होतं. मात्र शिक्षणांची ओढ त्यांच्या मनात कायम होती. त्यांच्या याच इच्छेला बळ दिले ते त्यांच्या लेकीनं म्हणजेच रुक्सारनं.
रुक्सारही यंदाच्या वर्षी बारावीत 66 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालीय. विशेष म्हणजे स्वतःचा अभ्यास सांभाळत तिने आपल्या वडिलांना दहावीच्या अभ्यासात मार्गदर्शन केलं. लेकीच्या या मार्गदर्शनामुळेच शरीफ खान यांनी दहावीची परीक्षा पास होण्याची किमया केलीय. दहावीनंतर पुढे पदवीपर्यंतचं शिक्षण घेण्याचा शरीफ खान यांचा मानस आहे