मुंबई : शिवसेनेने भाजपवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. भाजपने आज महाराष्ट्र बचाव आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाविरोधात शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'मधून टीकास्त्र सोडण्यात आले आहे. विरोधकांत शहाणपण उरले आहे काय, असा सवाल 'सामना'मधून विचारण्यात आला आहे. विरोधकांचे अंगण तर सरकारचे रणांगण सुरु आहे. डोकमकावळ्यांची फडफड सुरुच असल्याची जोरदार टीका करण्यात आली आहे.
प्रदेश भाजपचे 'महाराष्ट्र बचाव आंदोलन' म्हणजे नेमके काय, असा सवाल उपस्थित करत शिवसेनेने भाजपला टोकले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारच्या हाती महाराष्ट्र सुरक्षित असल्याची भावना जनतेची आहे. त्यामुळे सध्याच्या उठवळ विरोधी पक्षापासूनच महाराष्ट्राला वाचवा, असे सांगण्याची वेळ आली आहे, असे 'सामना' संपादकीयमध्ये म्हटले आहे.
राज्यात प्रकाशमान, तेजस्वी करण्याचे युद्ध सुरु असताना राज्य 'काळे' करण्याचे आंदोलन सुरु झाले आहे. डोमकावळ्यांचे हे फडफडणे औट घटकेचेच ठरेल, याविषयी काही शंका नाही. पाटील-फडणवीसांनी भान राखून वागावे आणि बोलावे. शहाण्यांना शबब्दांचा मार पुरेसा असतो, मात्र विरोधकांत शहाणपण उरले आहे काय, असा टोला शिवसेनेने लगावला आहे.
महाराष्ट्रातील विरोधी पक्षाने 'ठाकरे सरकार'विरुद्ध आंदोलन पुकारले आहे. सारा देश कोरोनाविरुद्ध लढ्यात झोकून देऊन काम करीत असताना राज्यातील भारतीय जनता पक्षाला फालतू आंदोलनाचे डोहाळे लागले आहेत. 'मेरा आंगण, मेरा रणांगण' अशा प्रकारचे बारसे या आंदोलनाचे झाले आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून या मंडळींना महाराष्ट्र वाचवायचा आहे. प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी फतवा काढला आहे की, राज्यातील जनतेने शुक्रवारी आपापल्या घराबाहेर पडावे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत काळे मास्क, काळे शर्ट, काळी रिबीन, काळे बोर्ड घेऊन राज्य सरकारचा निषेध करावा. चंद्रकांत पाटील आणि अन्य भाजप नेत्यांचे केस पांढरे झाले आहेत, मग काय केसही काळे करुन अंगणातील रणांगणात उतरणार का, असा थेट सवाल शिवसेनेने विचारला आहे.
कोरोना योद्धे रणांगणात लढत आहेत. आरोग्यविषयक आणीबाणी आहे. राज्य सरकार 'केरळ मॉडेल'चा मार्ग न स्वीकारता पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शाह यांच्याशी समन्वय साधून काम करीत आहे. कोरोना युद्धाचे नेतृत्व पंतप्रधान मोदींकडेच आहे आणि राहिल हे मुख्यमंत्री यांनी आधीच स्पष्ट केले आहे. हे जर भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांच्या पचनी पडत नसेल तर त्यांनी खुशाल आंदोलन करावे. मात्र हे आंदोलन त्यांच्याच नेत्यांच्या विरोधात ठरेल, हे त्यांनी लक्षात घ्यावे, असा इशाराही शिवसेनेना 'सामना'मधून दिला आहे.