गोरखपूरची घटना सामुदायिक बालहत्याकांडच - उद्धव ठाकरे

उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे रूग्णालयात ऑक्सिजन पुरवठा बंद केल्याने तब्बल ७० मुलांचा नाहक बळी गेला आहे. मात्र इतक्या धक्कादायक घटनेवर यूपी सरकार मौन बाळगून आहे. अशात शिवसेनेने या घटनेवरून यूपी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. उत्तर प्रदेशमधील गोरखपूरच्या इस्पितळातील ७० मुलांचे मृत्यू म्हणजे सामुदायिक बालहत्याकांडच आहे, ही गरिबीची विटंबना आहे. असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला आहे. 

Updated: Aug 14, 2017, 09:30 AM IST
गोरखपूरची घटना सामुदायिक बालहत्याकांडच - उद्धव ठाकरे title=

मुंबई : उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे रूग्णालयात ऑक्सिजन पुरवठा बंद केल्याने तब्बल ७० मुलांचा नाहक बळी गेला आहे. मात्र इतक्या धक्कादायक घटनेवर यूपी सरकार मौन बाळगून आहे. अशात शिवसेनेने या घटनेवरून यूपी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. उत्तर प्रदेशमधील गोरखपूरच्या इस्पितळातील ७० मुलांचे मृत्यू म्हणजे सामुदायिक बालहत्याकांडच आहे, ही गरिबीची विटंबना आहे. असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला आहे. 

इतकेच नाहीतर ऑगस्ट महिन्यात येथे मुले मरतातच असे सांगणाऱ्यांनाही उद्धव ठाकरे यांनी धारेवर धरले आहे. अशांना त्यांनी प्रश्न केलाय की, मग हा पटकीचा फेरा फक्त गरीबांच्या घरातच का शिरतो? ऑगस्टमध्ये मंत्र्यांच्या व दबंगांच्या घरात हा पटकीचा फेरा का शिरत नाही? गरीबांचे दुःख आणि वेदना राज्यकर्त्यांचे मन अस्वस्थ करीत नाही हेच आमच्या स्वातंत्र्याचे अपयश आहे. ही वेदनाच गरीबांची ‘मन की बात’ आहे, पण ती समजून घेण्याऐवजी त्या वेदनेची खिल्ली उडवली जाते, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे. सामनाच्या अग्रलेखातून त्यांनी ही टीक केली आहे. 

अग्रलेखातील ठळक मुद्दे खालीलप्रमाणे :

उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या एका वक्तव्यामुळे देशात टीकेची झोड उठवली गेली आहे, पण उत्तर प्रदेशातील गोरखपूरच्या इस्पितळात ७० बालकांनी तडफडून प्राण सोडले यावर अनेक ‘भोंग्यां’ची वाचा गेली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची पहिल्यापासून हुकमत असलेला गोरखपूर जिल्हा आहे. त्या गोरखपुरात बालकांच्या मृत्यूचे हे तांडव म्हणजे माणुसकीला आणि शासनाला कलंक आहे.

सरकारने बिले थकवली व ऑक्सिजनचा पुरवठा बंद पडला. हे असे घडले असेल तर उत्तर प्रदेशात ७० बालकांचे सामुदायिक हत्याकांड घडले आहे व या हत्याकांडाची जबाबदारी कोण घेणार? हिंदुस्थानचा स्वातंत्र्यदिन एक दिवसावर आला आहे व लाल किल्ल्यावरील पंतप्रधानांच्या भाषणाची जय्यत तयारी सुरू असताना उत्तर प्रदेशात बालमृत्यूचे तांडव घडावे हा स्वातंत्र्याचा अपमान आहे. 

केंद्रातील सत्तापरिवर्तनानंतर सामान्य व गोरगरीबांच्या जीवनात ‘अच्छे दिन’ येतील अशा आशेची किरणे उगवली होती, पण आजही ग्रामीण भागातील सरकारी इस्पितळात धड औषधे नाहीत, सुविधा नाहीत व ऑक्सिजनसारख्या आवश्यक गोष्टी नाहीत. मग बदलले ते काय? चारेक दिवसांत ७० मुले नक्की कशाने मेली यावर दडपादडपीचे प्रकार सुरू झाले आहेत. 

उत्तर प्रदेशचे आरोग्यमंत्री सिद्धार्थ नाथ निर्लज्जपणे सांगतात, ‘‘यहां तो अगस्त में बच्चे मरतेही है!’’ या भयंकर विधानाबद्दल या मंत्र्यांना ताबडतोब पदावरून दूर करायला हवे. हे मंत्री काँग्रेसचे किंवा यादवांच्या समाजवादी पक्षाचे असते तर त्यांना एव्हाना सुळावर चढवून राज्यकर्त्यांचे क्रियाकर्मही पूर्ण केले गेले असते. नशीब इतकेच की, ७० मुले मृत झाली हे तरी मान्य केले जात आहे. नाहीतर ‘‘कोण म्हणतेय मुलं मेली? फक्त त्यांचा श्वास बंद पडला आहे आणि त्यांच्या हातापायांच्या हालचाली थांबल्या आहेत.

स्वातंत्र्यदिनाची भाषणे त्यांच्या कानावर पडताच ही निपचीत पडलेली मुले जागी होतील व भारतमातेचा जयजयकार करतील,’’ असे ‘निवेदन’ एखाद्या शहाण्याने केले तरी आता आश्चर्य वाटणार नाही. ऑगस्ट महिन्यात येथे मुले मरतातच असे सांगणाऱ्यांना आमचा एक सवाल आहे. मग हा पटकीचा फेरा फक्त गरीबांच्या घरातच का शिरतो? ऑगस्टमध्ये मंत्र्यांच्या व दबंगांच्या घरात हा पटकीचा फेरा का शिरत नाही? (असे दुर्दैवाने म्हणावे लागते). कारण गरीब हा हतबल आहे, लावारीस बनला आहे व प्रत्येक सरकार त्याला फसवून खुर्च्या मिळवीत आहे. 

गरीबांचे दुःख आणि वेदना राज्यकर्त्यांचे मन अस्वस्थ करीत नाही हेच आमच्या स्वातंत्र्याचे अपयश आहे. ही वेदनाच गरीबांची ‘मन की बात’ आहे, पण ती समजून घेण्याऐवजी त्या वेदनेची खिल्ली उडवली जाते. उत्तर प्रदेशचे आरोग्यमंत्री सांगतात, ऑगस्टमध्ये मुले मरतातच. काय करणार त्या मंत्र्यांना! त्यांना एक सत्य सांगायला हवे. ऑगस्ट महिना हा क्रांतीचा आहे. ९ ऑगस्टला ‘छोडो भारत’ असा नारा देशभक्त लाखो स्वातंत्र्यसैनिकांनी ब्रिटिशांना दिला होता आणि १५ ऑगस्टला देशाला स्वातंत्र्य मिळाले हे विसरू नका.