मुंबई : राज्य सरकारच्या ३ वर्षपूर्तीचं औचित्य साधत शिवसेनेचे मुखपत्र सामनातून राज्य सरकारवर टीकाही केली आणि मुख्यमंत्र्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत.
सामनाच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार विरोधात जोरदार हल्ला चढविला आहे.
आधीच्या सरकारने महाराष्ट्राच्या विकासाला खीळ घातली. आधीचे सरकार भ्रष्ट व नालायक होते. त्यांच्याकडून काही भले होईल अशी अपेक्षा जनतेला नव्हती, असे तिसऱ्या वाढदिवशी मुख्यमंत्र्यानी सांगितले आहे. मग अशा कोडग्या, नालायक, भ्रष्ट लोकांबरोबर तुमचे सध्या कसले 'गुलुगूलु' सुरु आहे? याच कोडग्या, भ्रष्ट, नालायक लोकांना हाताशी धरून बंद दाराआड व पडद्यामागे शिवसेनाविरोधी कारस्थाने रचणार असतील तर त्या बंद दारास बाहेर कडीकुलपे लावून आत कोंडून गुदमरून टाकण्याची हिंमत शिवसेनेत आहे.
सरकारला तीन वर्षे झाली असली तरी शिवसेनेच्या संघर्षाचा इतिहास ५१ वर्षांचा आहे. म्हणजे भाजपच्या जन्माआधीचा आहे आणि शिवसेनेचे मोठेपण हे सत्तेतून आलेल्या तात्पुरत्या गालगुंडात नसून ते स्वाभिमानात व संघर्षात आहे. महाराष्ट्रातील शेतकरी हमीभावासाठी संपावर जातो अशा शेतकऱ्यांच्या भावना जाणून त्यांच्यामागे उभे राहणे हा गुन्हा आहे काय?
मुख्यमंत्र्यांच्या सर्व मुलाखती म्हणजे 'विकास गांडो थयो छे' ची पुढील आवृत्ती दिसत आहे. राज्यातील जनता सुखी नाही, त्यांच्या मनात राज्यकर्त्यांविषयी अस्थिरता आणि अस्वस्थता आहे. विकासाचे नाव नाही आणि याचे खापर मुख्यमंत्री फक्त शिवसेनेवर फोडत असतील तर विकासच नाही तर राज्यकर्त्यांच्या मानेवरील खोपडीचेही 'गांडो थयो छे!' असे म्हणावे लागेल.
शिवसेनेने विकासाला खीळ घातली असे मुख्यमंत्री सांगतात. मग, शिवसेना विकासाला खीळ घालत असताना मुख्यमंत्री म्हणून आपण काय करीत होता? असा सवालही विचारण्यात आला आहे.
शेतकरी आत्महत्या करतोय. त्याची कुटुंबे उध्वस्त होत आहेत. त्यांना कर्जमाफी द्या व कर्जमाफीची घोषणा करून तोंडाला पाने पूसू नका, असे ओरडून सांगणे यास मुख्यमंत्री विकासाला खीळ घालणे असे समजत असतील तर सरकारच्या डोक्यात 'खिळा' ठोकावाच लागेल.
उद्याच्या निवडणुकांत कोणी कुणाबरोबर हा तुमचा विषय आहे. शिवसेना नसली तरी सरकार वाचवण्यासाठी सिंचन घोटालावाल्यांचे समर्थन घेण्याची तुमची तयारी झालीच आहे. मुंबईसारख्या 'मराठी' राजधानी शहराचे महापौरपद विकत घेण्याची बोली लावणारे आपण. तुमच्या कर्तृत्वाने राज्य उजळून काढण्याची संधी जनतेने आणि शिवसेनेने तुम्हाला दिलीच होती.
हे राज्य पुढे जावे, लोकांना अच्छे दिन निदान महाराष्ट्रात तरी यावेत. या दिलदार भावनेनंच आम्ही तुमच्या खुर्च्यांना बळ दिले, पण खुर्च्यांवरील माणसांपेक्षा ढेकणें बरी असे म्हणण्याची वेळ लोकांवर आली असेल तर त्यास शिवसेना जबाबदार नाही.
विकासाला खीळ घालण्याइतके 'बालिश' राजकारण शिवसेनेने कधीच केले नाही. ज्यांनी ते केले त्यांच्या कर्माची फळे महाराष्ट्राची जनता भोगत आहे. तरीही आम्ही देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देत आहोत ! जमतंय का बघा. नाहीतर सोडून द्या. समझनेवालों को इशारा काफी है !