मुंबई : बेळगाव महानगरपालिका निवडणुकीत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवलं असून महाराष्ट्र एकीकरण समितीचा दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यामुळे आता बेळगाव महानगरापालिकेवर भाजपचा झेंडा फडकणार आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीला अवध्या दोन जागांवर समाधान मानावं लागलं आहे.
बेळगाव निकालावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. 'आज महाराष्ट्रात मराठी माणूस हरला म्हणून पेढे वाटले जातायत. ही नादानी आहे. इतकी गद्दारी कुणी केली नव्हती. याचे दुर्देव वाटतंय. लाज नाही वाटत का? पेढे वाटताना जल्लोष करताना लाज वाटली पाहिजे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
बेळगावमध्ये मराठी माणसाचा पराभव घडवून आणला गेला आहे, अनपेक्षित निकाल आहे हा, मी ईव्हीएमवर याचं खापर फोडणार नाही. कर्नाटकाच्या सरकारने मराठी माणसाचा पराभव घडवून बेळगावर मराठी माणसाचा हक्क राहू नये यासाठी काय गडबड केली त्याची माहिती बाहेर येईलच, असं राऊत म्हणाले.
बेळगाव निकालानंतर संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधला. 'बेळगाव महाराष्ट्रात येण्यासाठी शेकडो मराठी माणसं मेली. बाळासाहेब तुरुंगात गेले, गोपीनाथ मुंडेही एकीकरण समितीच्या पाठिशी होते, राजकारण नव्हते यात आणि तुम्ही पेढे वाटता मराठी माणूस हरल्याबद्दल? जल्लोष करताना आणि पेढे वाटताना मराठी माणूस म्हणून लाज वाटली पाहिजे, असा संताप राऊत यांनी व्यक्त केला.
तिथला भगवा कर्नाटकने उतरवला तेव्हा तुम्ही का गप्प बसता? असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.