मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. आजपासून विभागवार पदाधिका-यांच्या आढावा बैठका सुरु झाल्या आहेत. मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा बैठका होत आहेत. विदर्भ, मराठवाडा, खान्देश, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, ठाणे-पालघर आणि मुंबई अशा विभागवार बैठकांना सुरुवात झाली आहे. या विभागांतील विधानसभा संपर्क प्रमुखांची बैठक थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होत आहे. प्रत्येक मतदारसंघाचा सखोल आढावा या बैठकीत घेण्यात येतो आहे. तसेच विद्यमान आणि संभाव्य उमेदवारांच्या नावांचीही चर्चा बैठकीत सुरू आहे.
दुसरीकडे युतीचं घोडं अजून अडकलेलं आहे. भाजप युतीसाठी इच्छूक असली तरी शिवसेना यावर काय निर्णय घेते हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. य़ुतीवरुन दोन्ही पक्षाच्या कार्यकरर्त्यांमध्ये अजूनही संभ्रम आहे. महाराष्ट्रात शिवसेनाचा मोठा भाऊ राहिल. भाजपकडून आम्हाला सन्मानजनक प्रस्ताव आला तर युतीचा विचार करू असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी लोकसभा आणि राज्यसभेतील खासदारांची मातोश्रीवर बैठक बोलावली होती. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी म्हटले की, आगामी निवडणुकीत युती करण्यासाठी भाजपकडून आम्हाला कोणताही प्रस्ताव आलेला नाही असं म्हटलं होतं.
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना एकत्र लढल्या तर गणितं नक्कीच बदलणार आहेत. पण युतीचा निर्णय अजूनही गुलदस्त्यात दिसतो आहे. एकीकडे भाजपकडून युतीबाबत चर्चा सुरु असल्याचं बोललं जातंय पण शिवसेना युतीबाबत भाजपकडून कोणताच प्रस्ताव न आल्याचं म्हणते आहे. त्यामुळे युतीचं काय होणार याबाबत दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे.
दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीचं निश्चित झालं असून फक्त औपचारीक घोषणा करणं बाकी आहे. जागावाटप देखील जवळपास पूर्ण झाल्याचं सूत्रांकडून कळतं आहे. काँग्रेस भाजपविरोधी पक्षांचा एकत्र घेत महाआघाडीचा प्रयत्न करत आहे. मंगळवारी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत देखील आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. पण ही बैठत निष्फळ ठरल्याची माहिती पुढे आली होती.