Mumbai Parking News : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी. मुंबईत लवकरच ऑनलाईन पार्किंग आरक्षण सुविधा सुरु होणार आहे. त्यामुळे घरातून निघण्याआधी अॅपवरुन पार्किंग बुक करता येईल. त्यासाठी बीएमसी लवकरच एक अॅप कार्यान्वित करणार आहे. महापालिकेच्या उपलब्ध 32 पार्किंगमध्ये व्यवस्था पुरेशी ठरत नाही. त्यामुळे पार्किंग धोरण राबवण्यात येत आहे. यासाठी पालिका मुंबईतील खासगी सोसायटया, म्हाडा, सरकारी-खासगी कार्यालयांच्या मोकळया जागेत पार्किंगसाठी जागा निश्चित केली जाणार आहे. शिवाय ऑन रोड आणि ऑफ रोड पार्किंगसाठी व्यवस्था करण्यात येईल. यामुळे मुंबईतील बेकायदा पार्किंगसह वाहतूककोंडीचा तसेच गाड्या चोरीची प्रश्नही सुटण्यास मदत होईल.
मुंबईत जागा नसल्याने रस्त्याच्या बाजुला कुठेही गाड्या पार्क करण्यात येत आहेत. मात्र, महापालिका अतिक्रमण विभागाकडून त्यावर कारवाई करण्यात येते. तर काही वेळा गाड्याच उचलून किंवा टो लावून कारवाई होत असते. तर काहीवेळा चोरीचा धोकाही असतो. मात्र, या सगळ्यातून तुमची सुटका होणार आहे. घरातून निघण्याआधी मोबाईलवरुन अॅपवरुन पार्किंग बुक करण्याची सुविधा मुंबईकरांना लवकरच मिळणार आहे. यासाठी मुंबई महापालिका लवकरच एक अॅप सुरु करत आहे. यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली आहे.
या नवीन सुविधेमुळे मुंबईतील बेकायदा पार्पिंगसह वाहतूककोंडीचा प्रश्नही सुटण्यास मदत होणार आहे. मुंबईत दररोज गाड्यांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे बेशिस्त वाहनचालकांमुळे वाहतूक कोंडीत अधिक भर पडत आहे. रस्त्यावर गाड्यांची संख्या वाढल्याने पार्किंगची समस्या निर्माण होत आहे. पार्किंग समस्या सोडविण्यासाठी पालिकेकडून 32 पार्किंग तळ उभारण्यात आलेत. मात्र, तरीही गाडी पार्क करण्याची समस्या कायम आहे.
मुंबईत गाडी पार्क करायची असेल तर पार्किंग शोधण्यातच वेळ खर्च वाया जातो. पार्किंचा शोध घेत असताना गाडीसाठी जागा मिळेलच याची शाश्वती नसते. त्यामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. पालिकेच्या या नवीन सुविधेमुळे पार्पिंगसाठी जागा शोधत आता गाडी फिरवत बसण्याची वेळ येणार नाही. ज्या ठिकाणी जायचे आहे त्या ठिकाणी पार्किंगसाठी जागा उपलब्ध असल्याची माहिती पोहचण्यापूर्वीच मोबाईलच्या माध्यमातून समजणार आहे. तुम्ही तुमच्या मोबाईलवरुन पार्किंग बुक करु शकणार आहात.
मुंबईत जागेचा प्रश्न आहे. त्यामुळे पार्किंगसाठी जेथे मोकळी जागा असेल त्याचा विचार केला जाणार आहे. यासाठी पालिका मुंबईतील खासगी वसाहती, म्हाडा कॉलनी, सरकारी-खासगी कार्यालयांच्या मोकळ्या जागा याचा विचार करत आहे. या मोकळ्या जागेत पार्किंगसाठी जागा निश्चित केली जाणार आहे. शिवाय ऑन रोड आणि ऑफ रोड पार्किंगसाठी व्यवस्था केली जाणार आहे. पार्किंग अॅपपमुळे 1 लाख 25 हजार 510 वाहने पार्क करता येणार आहेत. तसेच तुम्हाला पार्किंग शुल्क ऑनलाइन भरता येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे पार्किंग अॅपमुळे मुंबईकरांना 24 तास कधीही ऑनलाइन पार्किंग बुक करता येणार आहे.