Anant Chaturdashi 2023, Mumbai News : मुंबईतील श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून (BCM) यंदाही विविध सोयी-सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. गुरुवार, दिनांक २८ सप्टेंबर २०२३ रोजी अनंत चतुर्दशी दिनी (Ganesh Visarjan 2023) होणाऱ्या गणेशमूर्ती विसर्जनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून विशेष तयारी करण्यात आली आहे. विसर्जन सुलभ, निर्विघ्नपणे पार पडावं यासाठी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सुमारे १० हजार कर्मचारी, ७१ नियंत्रण कक्ष तसेच अन्य विविध सोयीसुविधांसह सुसज्ज आहेत. यंदा गणेश मूर्ती विसर्जनासाठी ६९ नैसर्गिक स्थळांसह एकूण १९८ कृत्रिम विसर्जनस्थळांवर व्यवस्था आहे, अशी माहिती उपायुक्त तथा गणेशोत्सव समन्वयक रमाकांत बिरादार यांनी दिली आहे.
श्रीगणेशमूर्ती विसर्जनासाठी भाविकांना सुविधा व्हावी, विसर्जनस्थळी एकाच वेळी गर्दी होवू नये, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने https://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर मूर्ती विसर्जन वेळ नोंदणी करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी सुविधा विकसित केली आहे. मायबीएमसी व्हॉट्सअप चॅटबॉट (MyBMC WhatsApp Chatbot) या ८९९९-२२-८९९९ क्रमांकावरील चॅटबॉटमध्ये यंदा आपल्या नजीकचे गणेश मंडळ व मूर्ती विसर्जनस्थळ शोधण्याचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
नागरिकांनी श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन करताना काळजी घ्यावी: प्रशासनाकडून आवाहन
अनंत चतुर्दशी दिनी सर्व विसर्जनस्थळी नागरिकांनी पावित्र्य व मांगल्य जपावे. उत्सवादरम्यान गर्दीच्या तसेच विसर्जनस्थळी जबाबदारीने आणि सतर्कतेने वागावे. बृहन्मुंबई महानगरपालिका आणि मुंबई पोलीस दलाद्वारे दिल्या जाणाऱ्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाद्वारे करण्यात येत आहे.
उपायुक्त बिरादार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील घरगुती तसेच सार्वजनिक श्री गणेशमूर्तीच्या विसर्जनासाठी मागील दोन महिन्यांपासून पूर्वतयारी सुरू आहे. श्रीगणेशमूर्ती विसर्जनासाठी येणारे वाहन चौपाटीवरील वाळूमध्ये अडकू नयेत व मूर्तींचे विसर्जन सुरळीतपणे पार पडावे, याकरीता चौपाटीच्या किनाऱ्यांवर ४६८ स्टील प्लेट तसेच छोट्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी विविध ठिकाणी ४६ जर्मन तराफ्यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. चौपाट्यांवर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ७६४ जीवरक्षकांसह ४८ मोटरबोटी तैनात केल्या आहेत. विसर्जनापूर्वी भाविकांनी अर्पण केलेले हार, फुले इत्यादी निर्माल्य जमा करण्यासाठी १५० निर्माल्य कलशांसह २८२ निर्माल्य वाहनांचीही सोय करण्यात आली आहे.
यंदा अनंत चतुर्दशी दिवशी (दिनांक २८ सप्टेंबर २०२३) समुद्रात सकाळी ११ वाजता ४.५६ मीटरची भरती, सायंकाळी ५.०८ वाजता ०.७३ मीटरची ओहोटी, रात्री ११.२४ वाजता ४.४८ मीटर उंचीची भरती असेल.
यानंतर, दिनांक २९ सप्टेंबर २०२३ रोजी पहाटे ५.१५ मिनिटांनी ०.५६ मीटरची ओहोटी, सकाळी ११.३७ वाजता ४.७१ मीटरची भरती, सायंकाळी ५.४९ वाजता ०.३६ मीटरची ओहोटी असेल. या भरती तसेच ओहोटीदरम्यान विसर्जनासाठी चौपाट्यांवर येणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
महानगरपालिकेच्या विविध खात्यातील कर्मचाऱ्यांमध्ये योग्य तो समन्वय साधण्यासाठी मुख्य नियंत्रण कक्षासह प्रशासकीय विभागांच्या स्तरावर १८८ नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत. तर सुरक्षेच्या दृष्टीने ६० निरीक्षण मनोरे उभारण्यात आले आहेत. विविध ठिकाणी ६८ स्वागत कक्ष तयार करण्यात आले आहेत. आरोग्य विभागाकडून ७५ प्रथमोपचार केंद्रांसह ६१ रुग्णवाहिकादेखील सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. प्रभावी प्रकाश योजनेसाठी ‘बेस्ट’ च्या सहकार्याने खांबांवर व उंच जागी सुमारे १,०८३ फ्लडलाईट आणि २७ सर्चलाईट लावले आहेत. विसर्जनासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी १२१ फिरती प्रसाधनगृहं सज्ज ठेवण्यात आली आहेत. त्याचबरोबर आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी महानगरपालिकेतर्फे अग्निशमन दलाच्या सुसज्ज वाहनासहीत प्रशिक्षित मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहेत.
विसर्जनादरम्यान घ्यावयाची काळजी
१. समुद्राच्या खोल पाण्यात जाण्याचा प्रयत्न करु नये.
२. मूर्ती विसर्जनाकरीता महानगरपालिकेमार्फत नेमलेल्या प्रशिक्षित मनुष्यबळाची मदत घ्यावी.
३. अंधार असणा-या ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जनाकरीता जाणे टाळावे.
४. महानगरपालिकेने पोहण्याकरीता निषिद्ध केलेल्या क्षेत्रात जाण्याचा प्रयत्न करू नये.
५. समुद्रात किंवा तलावात कुणी बुडत असल्याचे निदर्शनास आल्यास त्वरित अग्निशमन दलाचे जवान, पोलिस किंवा जीवरक्षकांना कळवावे.
६. अफवा पसरवू नका किंवा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका.
७. भाविकांनी लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी. त्यांना पाण्यात जाऊ देऊ नये.
मत्स्यदंशापासून बचाव करा, वेळीच प्रथमोपचार घ्या
ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये मुंबई येथील समुद्राच्या किनारपट्टीवर ‘ब्लू बटन जेलीफीश’, ‘स्टिंग रे’ प्रजातीच्या माशांचा वावर अधिक दिसून येतो. या पार्श्वभूमीवर विसर्जनादरम्यान मत्स्यदंश होऊ नये, याची काळजी नागरिकांनी घेण्याचे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मत्स्यदंशाची घटना घडल्यास चौपाटी परिसरात वैद्यकीय कक्ष सज्ज ठेवण्यात आला आहे. तसेच एक १०८ रूग्णवाहिका तैनात करण्यात आली आहे.
1. ‘स्टींग रे’ने दंश केलेल्या जागी आग किंवा चटका लागल्याचा अनुभव येतो. जेलीफिशच्या दंशामुळे फार मोठ्या प्रमाणात खाज सुटते.
2.‘स्टींग रे’ किंवा ‘जेली फिश’चा दंश झाल्यास नागरिकांनी घाबरून जाऊ नये. तत्काळ नजीकच्या प्रथमोपचार केंद्रात किंवा रूग्णालयात जाऊन प्रथमोपचार घ्यावेत.
3. जेलीफिशचा दंश झालेले स्पर्शक काळजीपूर्वक काढून टाकावे.
4. जखम चोळली किंवा चोळून चिघळली जाणार नाही, याची खबरदारी घ्यावी.
5. मत्स्यदंश झालेली जखम स्वच्छ पाण्याने धुवून काढावी.
6. जखम झालेल्या जागी बर्फ लावावा.