धारावीची यशस्वी कहाणी : कोरोनामुक्तीच्या दिशेनं पहिले पाऊल

धारावीनं कोरोनामुक्तीच्या दिशेनं पहिले पाऊल टाकलंय

Updated: Dec 26, 2020, 09:28 PM IST
धारावीची यशस्वी कहाणी : कोरोनामुक्तीच्या दिशेनं पहिले पाऊल title=

कृष्णात पाटील झी मिडिया मुंबई : आशिया खंडातील सर्वात मोठी झोपड़पट्टी असलेल्या धारावीनं कोरोनामुक्तीच्या दिशेनं पहिले पाऊल टाकलंय. 1 महिन्यानंतर पहिल्यांदाच शुक्रवारी धारावीतून एकाही कोरोना रूग्णाची नोंद झालेली नाही. इथल्या वाढत्या कोरोना रूग्णसंख्येमुळं. इथली अधिकृत लोकसंख्या 6.53 लाख असली तरी स्थलांतरीत कामगार धरले तर 8 लाखांच्या वर लोकसंख्या केवळ 2.5 चौरस किमी क्षेत्रात राहते. म्हणजे लोकसंख्या घनता प्रतिचौकिमी 2.5 लाखांहून अधिक आहे. 

त्यातच छोटी छोटी घरे, भरमसाठ छोट्या छोट्या फॅक्टऱ्यांमुळं सोशल डिस्टन्सिंग पाळणं शक्य नव्हतं. त्यामुळं 1 एप्रिलला पहिला रूग्ण मिळाल्यापासून इथं रूग्णवाढीचा दर चढताच राहिला. 

त्यामुळं वाढता धोका लक्षात घेवून पालिकेनं इथं मिशन धारावी अंतर्गत चेस द व्हायरस कार्यक्रम हाती घेतला मुंबई महापालिकेनं चार 'टी'सुत्रीवर भर दिला. ट्रेसिंग, ट्रॅकिंग, टेस्टिंग आणि ट्रिटिंग. जिथं पॉझिटिव्ह रुग्ण मिळेल त्याच्या हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील लोकांना सुरूवातीला थेट इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन केलं. 

पालिका आणि खाजगी डॉक्टरांच्या माध्यमातून 47 हजार 500 घरांमध्ये जावून 3 लाख 60 हजार लोकांचे स्क्रिनिंग करण्यात आले. फक्त 10 ट्क्के गंभीर रूग्णांना धारावी बाहेरील रूग्णालयात हलवलं आणि 90 टक्के रूग्ण धारावीतच बरे झाले. सार्वजनिक शौचालयांचे नियमित सॅनेटाईझ करण्यासह कोरोना प्रसार रोखण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय करण्यात आले.  

कोरोना विरोधातील धारावी मॉडेल यशस्वी करण्यासाठी राज्य सरकार, पोलीस, खाजगी डॉक्टर, स्वंयसेवी संस्था आणि लोकप्रतिनिधींची मुंबई महापालिकेला साथ मिळाली.

धारावीतील खाजगी रूग्णालयांनीही कोरोना संकटात पालिकेला चांगली मदत केली. इथल्या साई हॉस्पिटलमध्ये सध्या बेड रिकामे असले तरी कोरोना उद्रेकात हे हॉस्पिटल कोरोना रुग्णांनी फुल्ल असायचं. कोरोनाविरोधातील धारावी मॉडेलची जगानं दखल घेतली आणि आता धारावी कोरोनामुक्तीच्या दिशेनं जातंय.