मुंबई : मुंबईकरांसाठी एक चागंली बातमी. मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांपैकी तानसा धरण आज दुपारी तुडूंब भरून वाहू लागले. कालपासूनच या धरण परिसरात जोरदार पाऊस झाला. दुसऱ्या दिवशीही पावसाने चांगलाच जोर धरला होता. संततधार पावसामुळे २०८ दशलक्षाहून घनमीटर क्षमतेचे हे धरण ओसंडून वाहू लागले आहे.
पाण्याच्या दाबामुळे सध्या धरणाचा एक दरवाजा पूर्ण क्षमतेने उघडला असून पावसाचा जोर कायम राहिल्यास इतर दरवाजेही लवकरच उघडण्याची शक्यता आहे. तानसा धरणामधून मुंबईकरांना दिवसाला ४५० दशलक्ष लीटर इतका पाणीपुरवठा केला जातो. मागीलवर्षी १७ जुलैला हे धरण तुडूंब भरून वाहू लागले होते.
दरम्यान, बदलापूरजवळचे बारवी धरण ६८ टक्के भरले आहे. गेल्या २४ तासात बारवी धरणात ६३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली, ठाणे, मीरा-भाईंदर आणि एमआयडीसी क्षेत्राला बारवी धरणातून पाणीपुरवठा केला जातो.