मुंबई : शिवसेना-भाजप युतीची उद्या घोषणा होण्याची शक्यता आहे. सेना - भाजपाच्या संयुक्त पत्रकार परिषद युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे. आज रात्री युतीचा फॉर्म्युला ठरण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भाजप आणि शिवसेनेचे नेते हे युती होणारच असा दावा करत आहेत. दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून असा दावा होत असला तरी दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपावरुन अजूनही ठरलेलं नव्हतं. त्यामुळे आता जागा वाटपाचा तिढा कसा आणि कोण सोडवणार हे आज रात्रीच कळेल.
युती होणार की नाही होणार यावर विधानसभा निवडणुकीचं सारं गणित अवलंबून असणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भाजप युतीची घोषणा ही पितृपक्षानंतर, घटस्थापनेला होईल अशी चर्चा होती. पण आता 24 सप्टेंबरला घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
रविवारी भाजप अध्यक्ष अमित शाह हे मुंबईत होते. पण यावेळी मात्र ते मातोश्रीवर गेले नाहीत. त्यामुळे आता युतीची भाजपला अधिक गरज नसल्य़ाची चर्चा होती. युतीबाबत आतापर्यंत अनेक फॉर्म्युले समोर आले आहेत.
याआधी शिवसेनेच्या जागांची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तयार करणार आहेत. नंतर ही यादी घेऊन मी पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी यांना दाखवून जागांचे ठरवू, असे सांगत युतीच्या जागावाटप तिढ्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार टोला लगावला होता.
शिवसेना १३५-१३५ च्या फॉर्म्युलावर ठाम असल्याचे सांगण्यात येत होते. तर भाजप शिवसेनेला ११० ते ११६ जागा देण्यास तयार असल्याचं देखील सुत्रांनी म्हटलं होतं. युती होणार की नाही, याचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मात्र, शिवसेना निम्या-निम्या जागावर अजूनही ठाम असल्याचे बोलले जात आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुतीलाच पुन्हा यश मिळेल. महायुतीच सत्ता मिळवेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला होता. त्यामुळे आता हा दावा किती खरा ठरेल हे युतीच्य़ा घोषणेनंतरच कळेल.