मुंबई : 'चंद्राबाबू नायडू व आमच्यात दूरध्वनीवरून चर्चा झाली असे बोलले जात आहे. असे बोलल्याचे आम्ही राष्ट्राच्या चौथ्या स्तंभात वाचले आहे. भिंतीलाही कान असतात हे आम्ही ऐकून होतो, पण आता दूरध्वनीलाही कान लागलेत की काय अशी शंका येऊ लागली आहे', असा टोला मारत राजकीय नेत्यांच्या हालचाली आणि त्याचे फोन टॅप होत असल्याचा अप्रत्यक्ष आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
शिवसेनेचे मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'दै. सामना'त लिहिलेल्या लेखातून भाजपबद्धलची आपली खदखद उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधताना तेलगू देसम पक्षाने भाजपवर व्यक्त केलेली नाराजी. तसेच, उद्धव ठाकरे आणि तेलगू देसमचे चंद्राबाबू नायडू यांच्याशी झालेले फोनवरील कथीत संवाद, केंद्रीय अर्थसंकल्प आणि एनडीएतील मित्रपक्षांशी भाजपचे असलेले वर्तन यावर सामनातील लेखातून टीका करण्यात आली आहे.
स्वतःच्या राजकीय लाभहानीचा विचार न करता बऱ्या-वाईट काळात खंबीरपणे साथ देणाऱ्या घटक पक्षांना सत्ता मिळाल्यावर बाजूला सारायचे हा प्रकार भाजपवाल्यांनी अनेकदा केला आहे. राजकारणात जुने-नवे व्हायचेच, पण सध्या जुन्या मित्रांना हाडवैरी ठरवून जी सत्तालोलुपता दाखवली जात आहे ती उबग आणणारी आहे, अशा शब्दांत ठाकरे यांनी मित्रपक्ष भाजपबद्ध नाराजी व्यक्त केली आहे.
शिवसेनेने भाजपची साथ कधीच सोडली नाही. त्यामुळे राजकीय तत्त्व, नीतिमत्ता, युतिधर्म यावर स्वतःची परखड मते मांडण्याचा अधिकार आम्हाला आहे. तेलुगू देसमने काँग्रेस आघाडीत सत्तासुख चाखले आहे. तसेच एनडीएतील इतर घटक पक्षांनीही अनेकदा बाहेरख्यालीपणा केला आहे. शिवसेना व अकाली दल वगळता प्रत्येकावर हा राजकीय बाहेरख्यालीपणाचा डाग लागला आहे, असेही ठाकरे यांनी म्हटले आहे.