अमोल पेडणेकर, झी मीडिया, मुलुंड : आजवर फासेपारधी, चड्डी बनियान टोळीचा पोलिसांनी सामना केला आहे. आता आणखी एका नव्या टोळीचा सामना पोलिसांना करावा लागणार आहे.
देवाला कौल देऊन घरफोड्या करणारी ही नवी तामिळ टोळी मुलुंडमध्ये दाखल झालीय.
नवघर पोलिसांनी नुकताच या टोळीचा पर्दाफाश केला असून घरफोडीच्या तयारीत असतानाच तिला गजाआड केलंय.
गेल्या काही दिवसात मुंबईसह ठाणे आणि इतर शहरांमध्ये होणा-या घरफोड्यांच्या घटनेनं मुंबई आणि ठाणे पोलीस हैराण झाले होते.
ठराविक ठिकाणी होत असलेल्या ब-याच घरफोड्यांच्या जागी पोलिसांना पिवळ्या रंगाची फुलं वाहिलेली दिसायची. त्यामुळे अशा घटनांची उकल करणं पोलिसांसमोर एक आव्हानच होतं.
मात्र, हे आव्हान यशस्वीपणे पेलण्याचं काम मुलुंडच्या नवघर पोलिसांनी करून दाखवलंय. ३० जानेवारीला पोलिसांनी पूर्व द्रुतगती महामार्गावर असलेल्या चेक नाक्यावर नाकाबंदी करून चार जणांच्या टोळीला गजाआड केलं.
एखाद्या शहरात घरफोडी करायची असेल तर ही टोळी प्रथम एखाद्या देवळात जायची. पिवळी फुलं आणि नारळ वाहून रिक्षानं एका चौकात यायची.
चौकात उतरून एका कोप-यात रस्त्यावक फुलं वाहून हातातील नारळ जमिनीवर तीन वेळा फिरवायाची.
नारळाची शेंडी ज्या दिशेकडे जाईल त्या रस्त्यानं जाऊन बंद घराची निवड करून घरफोडी करायची.
आरमोगम शेट्टी, शक्ती निर्मन, प्रवीण गायकवाड, आणि यशवंत मोहिते अशी त्यांची नावं आहेत. तर त्यांच्या तीन फरार साथीदारांचा पोलीस शोध घेतायत.
या टोळीला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेत. या टोळीने कुठे कुठे असे गुन्हे केले आहेत त्याचा तपास पोलीस करतायत.