मुंबई : आज जागतिक मराठी भाषा दिन आपण साजरा करत आहोत. सुभाष देसाई यांनी आम्हाला म्हणजे शासकीय स्तरावर मराठी भाषा सक्तीची केलीय. शासन जीआर वाचायला घेतला तर ती भाषा समजायला जरा अवघड जाते. ती थोडी सोपी करुन दिली तर आम्हाला कळेल, अशी कोपरखळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी लगावली.
शिवसेनेच्यावतीने आज जागतिक मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला त्यावेळी ते बोल्ट होते. मुंबईत गिरगाव चौपाटी येथे मराठी आणि संस्कृतीचे कलादालन, मरिन ड्राईव्ह येथे मराठी भाषा मंडळाची इमारत उभारण्यात येणार आहे. मराठी भाषेच्या अभ्याससाठी वाचनालय उभारत आहोत, असे ते यावेळी म्हणाले.
सध्याच्या पालकांचा कल सेमी इंग्रजी शाळांकडे आहे. त्यासाठी आपण महापालिका शाळेत नव्या एसएससी बोर्डासह 11 शाळा सीबीएससी आणि आयसीएससीकरता सुरू करणार आहेत. इतर पक्ष नाटकं करतात. पण, शिवसेना परखडपणे बोलते. मराठीचं काय होणार याची चिंता करत बसण्यापेक्षा आजचा दिवस साजरा करुया, अस आवाहन आदित्य ठाकरे यांनी यावेळी केलं.
दिल्लीच्या तख्तापुढे झुकली नाही आणि आजही मराठी दिल्लीपुढे झुकणार नाही. मी दिल्लीत बोललो, उत्तर प्रदेशमध्ये बोललो. तेच आता इथेही बोलतोय आणि सगळीकडे तेच बोलणार आहे. मुंबईतून, महाराष्ट्रातून एक एक गोष्टी हलविण्याचे एक एक डाव टाकले जात आहेत.
केंद्रीय एजन्सीचं जे काम सुरू आहे. ते प्रचारासाठीच सुरू आहे. कोणतंही राज्य या कारवायांना घाबरणार नाही, झुकणार नाही. प्रत्येक राज्यात शिवसेना निवडणूक लढून तेथील भूमिपुत्रांना न्याय देणार आहे. दिल्लीतून जे काही चालू आहे. ते थोडे दिवस थांबा. 2024 ला शिवसेना तिथे बसेल आणि हे सगळं थांबवेल. प्रत्येक राज्याला न्याय मिळेल, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला.