मुंबई : उर्मिला मातोंडकरनं काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. उर्मिला काँग्रेसमध्ये येऊन जेमतेम सहा महिने झाले होते. लंबी रेस की घोडी असं तिचं वर्णन केलं जायचं. पण काँग्रेसच्या कार्यपद्धतीला अखेर उर्मिला वैतागली. ती आली.... तिनं पाहिलं.... ती जिंकणारही होती... पण ती वैतागली आणि तिनं राजीनामा दिला. तिनं काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला.
उर्मिला मातोंडकरने मिलिंद देवरांना लिहिलेलं पत्र सार्वजनिक करण्यात आलं होतं, त्याबाबत तिनं नाराजी व्यक्त केली होती. या पत्रामध्ये उर्मिलानं संजय निरुपम यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती. हेच तिचं पत्र सार्वजनिक करण्यात आलं. त्याबाबत कोणतीही कारवाई न झाल्यानं नाराज झालेल्या उर्मिलाने राजीनामा दिला
उर्मिलाच्या राजीनाम्यानंतरही काँग्रेसमधला बघू, पाहू, हा बघेल, तो बघेल असा घोळ सुरूच आहे. काँग्रेसमध्ये केंद्रीय आणि मुंबई स्तरावरही अध्यक्षपदाचा प्रचंड घोळ सुरू झाला. रसातळाला जात चाललेल्या काँग्रेसमध्ये खरं तर उर्मिलाच्या येण्यानं थोडी जान आली होती. पण काँग्रेसच्या निर्णय न घेण्याच्या आणि घोळ घालण्याच्या कार्यपद्धतीला अखेर उर्मिला वैतागली.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये आलेली उर्मिला विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधून बाहेर पडली आहे.