अखेर बेबी फलकचा 'एम्स'मध्ये मृत्यू

गेले दोन महिने ‘एम्स’मध्ये मृत्यूशी लढत असणाऱ्या बेबी फलकचं अखेर निधन काल रात्री निधन झालं. बेबी फलक केवळ २ वर्षांची होती. फलकचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यामुळे झाल्याचं फलकवर उपचार करत असणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं.

Updated: Mar 16, 2012, 07:57 AM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

गेले दोन महिने ‘एम्स’मध्ये मृत्यूशी लढत असणाऱ्या बेबी फलकचं अखेर निधन काल रात्री निधन झालं. बेबी फलक केवळ २ वर्षांची होती. फलकचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यामुळे झाल्याचं फलकवर उपचार करत असणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं. ‘एम्स’मधील न्यूरोसर्जरीचे सहाय्यक प्रोफेसर दीपक आग्रवाल यांनी सांगितलं, “हार्ट ऍटॅकमुळे बेबी फलकचा मृत्यू झाला. रात्री ९ च्या सुमारास तिला हार्ट ऍटॅक आला. रात्री ९.४० ला तिला मृत घोषित करण्यात आलं.”

 

यापूर्वी एम्समधील डॉक्टरांनी फलकच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सांगितले होते. पुढील आठवड्यात फलकला हॉस्पिटलमधून डिस्चार्जही मिळणार होता. ९ मार्च रोजी दीपक आग्रवाल म्हणाले होते, की बेबी फलकची आपल्यावर झालेल्या जीवघेण्या प्रसंगातून बाहेर आली आहे. एक आठवड्याने तिला डिस्चार्ज दिला जाईल. तिच्या तब्येतीत जरी सुधारणा झाली असली तरी तिच्या डोक्याला पोहोचलेल्या जबरदस्त जखमेवर इलाज होणं बाकी होतं. हॉस्पिटल तिची पूर्ण काळजी घेत होतं आणि तिच्यावर फिजिओथेरपीद्वारे उपचारही केले जात होते.

 

१८ जानेवारी रोजी बेबी फलकला एक किशोरवयीन मुलगी हॉस्पिटलमध्ये घेऊन आली होती. या मुलीने फलक आपली मुलगी असल्याचा दावा केला होता. बेबी फलकच्या डोक्यावर गंभीर जखमा झाल्या होत्या. तसंच संपूर्ण शरीरावर चावे घेतल्याच्या खुणा होत्या. बेबी फलकवर झालेल्या या अत्याचारांची बातमी पाहून संपूर्ण देश हादरला होता. देशभरातून बेबी फलक वाचावी यासाठी प्रार्थना केल्या जात होत्या. दुर्दैवाने त्या अखेर निष्फळ ठरल्या. आणि २ वर्षांची बेबी फलक हे जग सोडून कायमची निघून गेली.