अण्णांसह टीमने सोडलं उपोषण

जनलोकपालचा रेटा लावून धरण्यासाठी करण्यात आलेले आंदोनल कोणतीही चर्चा न होता सुटले. सरकारने टीम अण्णांकडे लक्षही दिले नाही. त्यामुळे कोणतीही मागणी पदरात न पाडता, जनलोकपाल विधेयकासाठी गेल्या दहा दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या अण्णा हजारे आणि टीम अण्णांनी अखेर आज उपोषण सोडले.

Updated: Aug 3, 2012, 07:57 PM IST

www.24taas.com , नवी दिल्ली

जनलोकपालचा रेटा लावून धरण्यासाठी करण्यात आलेले आंदोनल कोणतीही चर्चा न होता सुटले. सरकारने टीम अण्णांकडे लक्षही दिले नाही. त्यामुळे कोणतीही मागणी पदरात न पाडता, जनलोकपाल विधेयकासाठी गेल्या दहा दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या अण्णा हजारे आणि टीम अण्णांनी अखेर आज उपोषण सोडले.

उपोषण सोडण्यापूर्वीच राजकीय आखाड्यात उतरणार असल्याचं टीम अण्णाने जाहीर केलं.  तर अण्णा हजारे यांनी आपण स्वत: निवडणूक लढणार नसल्याचं स्पष्ट केलं. भ्रष्टाचार फोफावला आहे. त्यासाठी देशात परिवर्तनाची गरज  आहे. म्हणूनच आम्ही निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहोत,असं अण्णांनी जाहीर केले.

माजी लष्करप्रमुख जनरल व्ही के सिंग यांच्या उपस्थित अण्णा आणि त्यांच्यी टीमने उपोषण समाप्त केलं. दोन महिन्यांपूर्वीच निवृत्त झालेले जनरल व्ही. के.सिंग यांनी यावेळी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. लष्कर एवढ्या चांगल्या प्रतीचं काम करुन दाखवते तर मग सरकारला ते का जमत नाही, असा सवाल सिंग यांनी उपस्थित केला. तसंच भ्रष्टाचार हे देशासमोरचं मोठं आव्हान आहे, असंही त्यांनी सांगितलं.

टीम अण्णातील सदस्यामध्येच राजकीय पक्ष काढण्यावरून मतभेद असल्याचं स्पष्टपणे समोर आलं आहे. मनिष सिसोदिया आणि प्रशांत भूषण यांनी परस्पर विरोधी मतं व्यक्त केली आहेत. प्रशांत भूषण यांच्या मते राजकीय पर्याय तयार करण्यावाचून आता गत्यंतर नाही. तर सिसोदिया आणि कुमार विश्वास यांच्या मते अजून कुठलाही ठाम निर्णय झालेला नाही. तर मेधा पाटकर यांनी हजारदा विचार करावा, असे सूचविले आहे.

Tags: