www.24taas.com, लातूर
राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळ पडला आहे, अनेकांना पाण्यासाठी जीवाचा आटापिटा करावा लागतो आहे. तर लातूर शहरामध्ये पिण्याच्या पाण्याने रस्ते धुतले जात असल्याचं समोर आलं आहे. आणि सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानेच रात्रीच्या अंधारात हा प्रकार केला गेला. महाराष्ट्रात एकीकडे भीषण दुष्काळ. थेंबभर पाण्यासाठी मैलोंमैल करावी लागते पायपीट.
परंतू लातूरच्या जिल्हा प्रशासनाला मात्र या दुष्काळाची काहीच धग पोहचत नसल्यानं पिण्याच्या पाण्यानं असे रस्ते धुतले जातात. शहरातील गांधी चौक ते शिवाजी चौक हा २ किमीचा रस्ता महाराष्ट्र दिनानिमित्त असा मध्यरात्री पाण्याने धूवुन स्वच्छ केला जातो आहे आणि धक्कादायक बाब म्हणजे लातूरचे जिल्हाधिकारी तथा मनपाचे प्राधिकृत अधिकारी बिपीन शर्मा यांच्या आदेशानुसारच हा प्रकार सुरु आहे. कोणाला समजू नये याची पूरेपूर काळजी घेत वेळही अगदी मध्यरात्रीची साधली. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाची नोंदही अग्निशमन दलाच्या डायरीत आहे.
लातूर शहराला ७० किलोमीटर लांब असलेल्या मांजरा धरणातून पाणी पुरवठा होतो. हे पाणी जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून गांधी चौकातल्या पाण्याच्या टाकीद्वारे शहराला पुरवलं जातं. या पिण्याच्या पाण्याच्या टाकीतूनच २४ हजार लीटर पाण्याने मध्यरात्री लातूरचे रस्ते चकचकीत करण्यात आले. या पाण्याने दुष्काळग्रस्त भागातल्या अनेक कुटुंबांची तहानही भागवता आली असती. परंतु लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना या पाण्यानं साफ करायचे होते रस्ते. म्हणूनच सरकारी बाबूना दुष्काळग्रस्तांविषयी किती आस्था आहे आणि शहरी स्वच्छतेचा किती कळवळा आहे. हेच स्पष्टं होतं.