www.24taas.com, भारत गोरेगावकर, रायगड
१५ जून ते १५ ऑगस्ट दरम्यान मासेमारी बंद असल्यामुळे सर्व समुद्र किनाऱ्यांवर होड्या नांगरण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक समुद्र किनाऱ्यावर रंगीबेरंगी वातावरण आहे. पावसाळा सुरू झाला की समुद्रात वाहू लागतात वादळी वारे आणि सुरू होतो लाटांचा खेळ...त्यामुळे पावसाळ्यात खोल समुद्रात मासेमारीला गेलेल्या मच्छिमारांच्या जीवाला धोका निर्माण होऊन विपरीत अपघात होण्याची शक्यता असते.
तसंच पावसाळा हा माशांचा प्रजनन काळ असतो. त्यामुळे राज्य शासनानं गेल्या अनेक वर्षांपासून १५ जून ते १५ ऑगस्ट या दोन महिन्यांच्या कालावधीत मासेमारी बंद ठेवण्याचे आदेश दिलेत. त्यामुळे रायगडमधील समुद्र किना-यांवर रंगीबेरंगी होड्या लावण्यात येतात. आणि दोन महिन्यांत होड्यांची डागडुजी, जाळ्यांचं शिवणकाम, आणि बोटीच्या इंजिनचं काम केलं जातं.
होड्यांच्या डागडुजीनंतर खलाशांना सुट्टी दिली जाते...तब्बल दोन महिन्यांनंतर नारळीपौर्णिमेला मच्छिमार बांधव पुन्हा नव्या जोमाने आपल्या होड्या समुद्रात मासेमारीसाठी उतरवतात.