www.24taas.com, शहापूर
मुंबईला पाणीपुरवठा करणारा तालुका ही शहापूर तालुक्याची ओळख...मात्र मुंबईची तहान भागवणा-या याच तालुक्याला सध्या भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
शहपूर तालुक्यातल्या डेंगनमाळ गावात ग्रामस्थांना हंडाभर पाण्यासाठी तासनतास प्रतीक्षा करावी लागतीय. अक्षरशा विहिरीत शिडीच्या सहाय्यानं उतरून पाणी भरण्याची वेळ इथल्या ग्रामस्थांवर आलीय. छोट्याशा डबक्यातून लोटाभर पाणी उपसणारी ही मुलं..हे दृश्यचं मुळी गलबलून टाकणारं आहे.
ठाणे जिल्ह्यातल्या वाडा, मोखाडा, विक्रमगड, जव्हार या भागातही हीच परिस्थिती आहे. डेंगनमाळ गावात फेब्रुवारीपासून पाण्याचं दुर्भिक्ष आहे. पण इथल्या जनतेच्या व्यथांची दखल प्रशासनानं घेतलेलीच नाही. त्यामुळे पाण्यासाठी लोकांना अशी तारेवरची कसरत करावी लागतीय.
ठाणे जिल्ह्यातल्या शहापूर तालुक्यात पाणी टंचाईनं विदारक स्वरुप धारण केलंय. हंडाभर पाण्यासाठी तासोनतास टँकरची वाट गावक-यांना पाहावी लागत आहे. पाण्याचा टँकर गावात आल्यानंतर त्याचं पाणी विहिरीत ओतलं जातं...त्यामुळं गावकतल्या महिला-पुरूष आणि लहान मुलं हंडाभर पाण्यासाठी विहिरीच्या अवतीभोवती चातकासारखे उभे राहून टँकरची वाट पाहात असतात.
विहिरीत पाणी ओतल्यानंतर केवळ काही क्षणातच ही विहिर पुन्हा कोरडी होते. गावक-यांच्या नशिबी केवळ हंडाभर पाणी येतं. त्यामुळं लगेचच दुस-या टँकची वाट पाहण्याशिवाय त्यांच्या समोर पर्याय राहत नाही. हे केवळ एका दिवसाचं दृश्य नसून आता हा नित्याचाच नियम झालाय.