'किडनी'च्या प्रेमाची गोष्ट !

किडनी खराब झाल्यामुळे डायलिसीसच्या असह्य दु:खाचे वाटेकरी असलेले दोघे रुग्ण चक्क विवाहबंधनात अडकल्याची सुखद घटना जळगावात घडली आहे. पतीला बहिणीकडून तर पत्नीला आईकडून किडनी दान मिळाली.

Updated: Jan 6, 2012, 09:23 PM IST

www.24taas.com, जळगाव

 

किडनी खराब झाल्यामुळे डायलिसीसच्या असह्य दु:खाचे वाटेकरी असलेले दोघे रुग्ण चक्क विवाहबंधनात अडकल्याची सुखद घटना जळगावात घडली आहे. पतीला बहिणीकडून तर पत्नीला आईकडून किडनी दान मिळाल्यानं दोन जीवांची नवी पहाट उदयास आली.

 

असह्य आजारामुळे जीवनातील गोडी कमी होते. मात्र अशा काही रुग्णांच्या जीवनात पुन्हा सुखाची पहाट उजाडते आणि मग एका नव्या जीवनाला सुरवात होते. जळगावातील किशोर सुर्यवंशी याच्या दोन्ही किडनी निकामी झाल्या होत्या. मुंबईत उपचार सुरु असतानाच किशोरची ओळख आरती काशीकर या बऱ्हाणपूरच्या मुलीशी झाली. तिचीही व्यथा किशोरसारखीच होती. ओळखीचं रुपांतर गाठीभेटी वाढण्यात होत गेलं. वारंवार भेटी होत असतानाच विवाहबंधनाच्या दिशेने कधी पाऊल पडलं हे त्यांनासुद्धा कळलं नाही. नवीन जीवनाच्या प्रवासासाठी स्वप्नांचं गाठोडं घेऊन हे दोघे जीवाभावाचे साथीदार मार्गस्थ झाले आहेत.

 

किशोरचा संसार फुलण्यासाठी त्याची बहीण छाया पुढे सरसावली. तिनं एक किडनी दान केली. तर मुलीचा सुखाचा संसार पाहण्यासाठी सुनिता काशीकर यांनी आरतीला किडनी दान केली.

 

विशेष म्हणजे किशोरची बहीण छाया हिनं स्वतः अविवाहीत राहण्याचा निर्णय घेतला आहे. इतकंच नाही तर इतरही रुग्णांना दिलासा देण्यासाठी किडनी फाऊंडेशनची स्थापना छाया सूर्यवंशी यांनी केली आहे. सूर्यवंशी आणि काशीकर कुटुंबाचे हे पाऊल समाजासाठी नक्कीच आदर्शवत असंच आहे.