राष्ट्रवादीतील अंतर्गत राजकारण शिगेला

पिंपरी चिंचवडमध्ये स्थायी समितीच्या अध्यक्षपदावरून राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत राजकारण शिगेला पोहचलंय. अजितदादांचे निकटवर्तीय जगदीश शेट्टी यांचं नाव जवळपास निश्चित झालंय.

Updated: Apr 3, 2012, 08:18 AM IST

कैलास पुरी, www.24taas.com, पुणे

 

पिंपरी चिंचवडमध्ये स्थायी समितीच्या अध्यक्षपदावरून राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत राजकारण शिगेला पोहचलंय. अजितदादांचे निकटवर्तीय जगदीश शेट्टी यांचं नाव जवळपास निश्चित झालंय. असं असताना पिंपरी-चिंचवडमधल्या तीनही आमदारांनी जगदीश शेट्टी यांच्या विरोधात मोर्चे बांधणी केल्यानं चित्र बदललंय.

 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी उद्या अर्ज भरले जाणार आहेत. या पदासाठी राष्ट्रवादीकडून अजित पवारांचे निकटवर्तीय जगदीश शेट्टी यांचं नाव सर्वाधिक चर्चेत आहे. मात्र महापौर मोहिनी लांडे यांना शेट्टी त्रासदायक ठरतील आणि पालिकेच्या आर्थिक नाड्या शेट्टी यांच्या हातात जातील या भीतीनं त्यांच्या नावाला विरोध होऊ लागलाय. त्यामुळेच मोहिनी लांडे यांचे पती आमदार विलास लांडे यांनी नवनाथ जगताप या नवख्या उमेदवारासाठी मोर्चेबांधणी सुरू केलीय. तर आमदार लक्ष्मण जगताप आणि अण्णा बनसोडे यांनीही शेट्टी यांच्या नावाला विरोध दर्शवलाय.

 

जगदीश शेट्टी हे आझम पानसरे यांच्या यांच्या गटातले आहेत. त्यातच ते अजित पवारांच्याही जवळचे आहे. त्यांची शक्ती महापौरांसाठी त्रासदायक ठरू शकते त्यामुळेच त्यांच्याविरोधात जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. अर्थात कुणी कितीही ताकद लावली तरी शेवटी अंतिम निर्णय हा अजितदादांच्या हाती आहे. त्यामुळे स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते याकडेच साऱ्यांचं लक्ष लागलंय.