www.24taas.com, पुणे
पुणे जिल्ह्यातल्या विद्यावती अनाथाश्रमातली पापं अजून सुरूच आहेत. या आश्रमात एक अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्यानं खळबळ उडाली होती. काही दिवसांपूर्वी या अल्पवयीन मुलीनं एका मुलीला जन्म दिलाय. पण त्यानंतरही बालविकास अधिका-यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करण्यात येतोय.
पुणे जिल्ह्यातल्या विद्यावती आश्रमाचं गूढ अजूनही कायम आहे. या आश्रमातली १४ वर्षांची मुलगी गरोदर असल्यानं खळबळ उडाली होती. त्यानंतर याच आश्रमातल्या १२ वर्षांच्या दोन मुलांना बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. दरम्यानच्या काळात या अल्पवयीन मुलीनं काही दिवसांपूर्वी एका बाळाला जन्म दिला. मात्र संबंधित मुलीचा डीएनए रिपोर्ट अजूनही मिळाला नसल्यानं नवजात बाळाचा बाप कोण, या प्रश्नाचं उत्तर मिळणं अजूनही बाकी आहे. सुरुवातीपासूनच या आश्रमाचा संचालक राजेंद्र गुप्ता आणि महिला बालकल्याण विभागाचे अधिकारी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचं समोर आलं होतं. आता महिला आणि बालविकास अधिकारी सुवर्णा पवार या बाळ देण्यासाठी धमकावत असल्याचा आरोप पीडित मुलगी आणि तिच्या नातेवाईकांनी केलाय.
एवढंच नव्हे तर ही मुलगी गरोदर असल्याचं तिच्या नातेवाईकांना अनेक दिवस सांगण्यातच आलं नाही. तसंच तिला नातेवाईकांना भेटूही दिलं नाही. सध्या या मुलीची विद्यावती आश्रमातून दुस-य़ाच आश्रमात रवानगी करण्यात आलीय. त्यामुळे सरकारी अधिकारी आणि संस्थाचालकांवरचा संशय आणखीनच बळावतोय. विद्यावती आश्रमातला हा पहिलाच गैरप्रकार नाही. काही दिवसांपूर्वी या आश्रमातल्या ४४ मुलांची आडनावं बदलून ती अग्रवाल केल्याचंही उघड झालं होतं. मात्र कुठल्याच प्रकाराबद्दल संस्थाचालकांवर कारवाई करण्यात आलेली नाही.
संबंधित बातम्या
अनाथआश्रमातील १४ वर्षाच्या मुलीवर बलात्कार