पेट्रोल दरवाढीविरोधात आज दिवसभरात अनेक ठिकाणी वेगवेगळी आंदोलनं पाहायला मिळाली... एक नजर टाकुयात मुंबई, डोंबिवली, शिर्डी आणि सोलापूरात आज वेगवेगळ्या पक्षांकडून करण्यात आलेल्या आंदोलनांवर. विशेष म्हणजे या आंदोलनात ला सामान्यांचा सहभागही उल्लेखनीय होता.
एक नजर टाकुयात आज दिवसभरात महायुतीनं पेट्रोल दरवाढीच्या विरोधात महाराष्ट्रभर केलेल्या आंदोलनांवर...
मुंबई
पेट्रोल दरवाढीविरुद्ध राज्यात जागोजागी निदर्शनं सुरू आहेत. मुंबईत इस्टर्न एक्सप्रेस हायवेवर मुलुंड-भांडुप दरम्यान ‘आरपीआय’च्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला. पेट्रोल दरवीढीच्या निषेधार्थ कार्यकर्ते अक्षरश: रस्त्यावर उतरले. मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर आंदोलन सुरू असल्यानं वाहतुकीत मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होतोय.
डोंबिवली
पेट्रोल दरवाढीचा निषेध करण्यासाठी डोंबिवलीत रेलरोको आंदोलन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. डोंबिवली स्थानकात आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी डोंबिवली-सीएसटी ट्रेन रोखून धरण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी लगेचच या कार्यकर्त्यांना अटक केली.
शिर्डी
पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ शिर्डीत भाजप कार्यकर्त्यांनी बैलगाडी मोर्चा काढला. पेट्रोल दरवाढ त्वरित मागे घेण्यात यावी अन्यथा एकाही मंत्र्याला तसंच नेत्याला शिर्डीत पाऊल ठेवू देणार नाही, असा इशारा देण्यात आलाय. यावेळी ‘काँग्रेस सरकार हाय-हाय’च्या घोषणा देत नगरपालिका भवनापासून हा बैलगाडी मोर्चा काढण्यात आला.
सोलापूर
पेट्रोल दरवाढीच्या विरोधात सोलापुरात भाजपनं आज आंदोलन केलं. यावेळी एक मोटारसायकल जाळताना स्फोट झाला. त्यामध्ये आमदार विजय देशमुख जखमी झाले. पेट्रोल दरवाढीच्या विरोधात भाजपनं आंदोलन आयोजित केलं होतं. या आंदोलनासाठी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं जमले होते. या वेळी संतप्त कार्यकर्त्यांनी एक मोटारसायकल जाळून त्यांचा रोष व्यक्त केला. मात्र, त्यावेळी स्फोट झाला. या स्फोटात एक कार्यकर्ता गंभीर जखमी झालाय.
आज सकाळपासून कुठं कुठं झाली आंदोलनं... ते पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा...
- http://zeenews.india.com/marathi/?p=107312