www.24taas.com, झी मीडिया, पंढरपूर
पंढरपूरची वारी.... अवघ्या महाराष्ट्रातल्या भक्तीरंगाला उधाण आणणारा हा सोहळा.... गळ्यात तुळशीची माळ आणि खांद्यावर वीणा घेऊन महाराष्ट्रातला वारकरी शेकडो वर्षांपासून वारी करतोय. मुळातच विठोबाला साध्याभोळ्या शेतक-याचा देव.... त्यामुळे मुखात विठ्ठलाचं नाम आणि त्याच्या सोबतीला हातातले टाळ वाजू लागले की वारक-याची ब्रह्मानंदी टाळी लागते आणि वारीमधला हा गजर भान हरपून टाकतो....
आजवर हेच चित्र, हाच विठूचा गजर पाहून महाराष्ट्र सुखावलाय. पण वारीचं चित्र हळूहळू बदलतंय. कदाचित काळाच्या पावलांबरोबर वारी आधुनिक होतेय. निवृत्तीनाथांच्या पालखीत हे बदललेलं चित्र पहायला मिळालं. निवृत्तीनाथांच्या पालखीत चक्क डीजे लावण्यात आला होता. विठ्ठलाच्या गाण्यावर आणि डीजेच्या तालावर वारकरी नाचत होते. वारकऱ्यांच्या भक्तीचा आणि नृत्याचा हा काहीसा वेगळा आणि आजपर्यंतच्या वारीच्या चित्राला छेद देणारा प्रकार पहायला मिळाला.
कुणाला कुठले सूर गोड वाटतील हा खरं तर ज्याचा त्याचा प्रश्न. पण या सांस्कृतिक सोहळ्याचा ठेका चुकता कामा नये. साध्या एकतारीबरोबर एकरुप झालं तरी विठ्ठलाच्या भजनात नाहता येतं. त्यामुळे वारीचं स्वरुप बदलताना भक्तीचा सूर बेसूर होऊ देऊ नका.....
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.