www.24taas.com, झी मीडिया, ढाणकी/नांदेड
हॉटेलमध्ये साधा नोकर असलेल्या एका तरुणानं आपला प्रामाणिकपणा सिद्ध केलाय. त्यानं चक्क पाच लाख रुपयांचा ऐवज सापडूनही मोह आवरला आणि ज्याचे पैसे त्याला सहिसलामत परत केले. हे पैसे होते एका मुलीच्या लग्नाचे.
माणुसकीवरचा विश्वास दृढ करणारी ही घटना ढाणकी गावात घडली आणि तो प्रामाणिक माणूस आहे शेख तौफिक! ग्रामीण भागात एक म्हण आहे, "विश्वासावरच जग चालते`... याचाच अर्थ आजही नीतीमत्ता कायम आहे. याचाच प्रत्यय ढाणकी इथल्या रेणुका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या शे. तौफिक शे. रफीक यांनी दिला.
अठराविश्वे दारिद्य्रात जीवन जगणारा तौफिक हॉटेलमध्ये काम करून कुटुंबाचा गाडा ओढतो. परंतु, सारी कामं विश्वासानं करतो. गरिबी असली तरी मनात कोणतीच लालसा नाही. श्रीमंतीची हाव नाही. इमानदारीचं फळ निश्चितच चांगलं मिळतं, या उद्देशानं नेकीनं काम करणाऱ्या शे. तौफीकच्या इमानदारीमुळं एका मुलीचं शुभमंगल पार पडलं.
ढाणकी इथल्या रेणुका हॉटेलमध्ये 9 मे रोजी सकाळी नेहमीप्रमाणे गर्दी होती. बाहेरगावहून फराळ करण्यासाठी चार ग्राहक आले. हॉटेलात चहापाणी घेतले अन् निघून गेले. काही वेळानं चहा करणाऱ्या तौफिकला एक बॅग दिसली. ती बॅग त्यानं हातात घेताच बॅगेत जडवस्तू असल्याचं जाणवलं. त्यानं हॉटेलमालक बालाजी भोयर यांना ती बॅग दिली. त्यांनी बॅग उघडून पाहिली तर बॅगेत नोटांचं बंडल दिसून आले. त्यांनी ती बॅग तशीच ठेवली. थोड्या वेळानं बॅगेचा शोध घेत ग्राहक परत आले. हॉटेलमध्ये सारेच कावरे-बावरे होऊन पाहत होते. नंतर इथं कुणाची बॅग विसरली आहे का, याची चौकशी हॉटेलमालक बालाजी भोयर यांनी केली. ती बॅग हिमायतनगरहून आलेल्या गुंडावार यांची होती.
आपल्या मुलीच्या लग्नाच्या खरेदीसाठी त्यांनी हे पैसे आणले होते. भोयर यांनी अधिक चौकशी करून संबंधिताला बॅग परत केली. बॅग परत मिळाल्यानं वधूपित्याचा आनंद ओसंडून वाहत होता. नवरी मुलीच्या अंगावरील सोन्याचे दीड लाखाचे दागिने, खरेदीसाठी आणलेले चार लाख रूपये परत मिळाल्यानं मुलीच्या लग्नासाठी घेतलेले दागिने तसंच वर मुलासाठी कपडे आणि खरेदीसाठी आणलेली रक्कम परत मिळाल्यानं वधूपिता यांनी शे. तौफिकचे आभार मानले.
"एवढी रक्कम आणि दागिने हरविले असते तर कदाचित माझ्या मुलीचं लग्नच खोळंबलं असतं. शेख तौफिक यानं माणुसकी दाखवून पैसे परत केल्यानं माझ्या मुलीचे शुभमंगल होत आहे. शेख तौफिकच्या प्रामाणिकपणामुळंच माझी मुलगी नवरी म्हणून बोहल्यावर चढली, असं वधुपिता गुंडावार म्हणाले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.