खड्डय़ांमुळे बाळाचा झाला मृत्यू

मोगरा या गावातील आरोग्य उपकेंद्र कायम बंद असल्याने गर्भवतीला बसमधून तपासणीसाठी माजलगाव येथे नेण्यात येत होते; मात्र रस्त्यातील खड्डय़ांमुळे गर्भवती महिला बसमध्येच प्रसूत झाली.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Aug 6, 2013, 05:02 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, माजलगाव
मोगरा या गावातील आरोग्य उपकेंद्र कायम बंद असल्याने गर्भवतीला बसमधून तपासणीसाठी माजलगाव येथे नेण्यात येत होते; मात्र रस्त्यातील खड्डय़ांमुळे गर्भवती महिला बसमध्येच प्रसूत झाली. अती खड्ड्यांमुळे आदळून चिमुरड्याचा जग पाहण्यापूर्वीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी घडली.
बीड जिल्ह्यातील सर्वच रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. सर्वत्र खड्डय़ांचे साम्राज्य आहे. या खड्डय़ांनी सोमवारी एका बाळाचा बळी घेतला. तालुक्यातील मोगरा येथील शोभा अनिल बाणाईत या गर्भवती महिलेला गावातील आरोग्य उपकेंद्र बंद असल्याने तपासणीसाठी माजलगाव येथे बसद्वारे नेले जात होते. मात्र रस्त्यांवरील खड्डय़ांमुळे शोभाला बसमध्येच प्रसूती कळा सुरू झाल्या. चालकाने बस कमी वेगाने चालविण्याचा प्रयत्न केला. पण खड्डे चुकवणार तरी किती. प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही शोभा बसमध्येच प्रसूत झाली. प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली.
मोगरा येथील सामाजिक कार्यकर्ते अरूण गोसावी हे याच बसमध्ये होते. बस माजलगाव येथे पोहोचताच त्यांनी सदर महिलेला व बाळाला खासगी दवाखान्यात नेले. मात्र तेथील डॉक्टरांनी बाळाचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेमुळे गावातही हळहळ व्यक्त केली जात असून रस्त्यावरील खड्डय़ांनीच बाळाचा बळी घेतल्याचे बोलले जात आहे.
बिनकामाचे उपकेंद्र
मोगरा येथे आरोग्य उपकेंद्र असून उपकेंद्राची इमारतही आहे; मात्र येथे महिला परिचारकांची पदे रिक्त आहेत. येथे कोणी परिचारिका अथवा डॉक्टर फिरकत नाही. उपकेंद्र कायम बंदच असते. येथील उपकेंद्र कार्यरत असते तर ही दुर्दैवी घटना घडली नसती, असे गावकऱ्यांना वाटत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.