www.24taas.com, झी मीडिया, औरंगाबाद
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आज दुष्काळग्रस्त मराठवाड्याच्या दौर्यावर येत आहेत. या दौर्यात ते औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकरी आणि मजुरांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्या अडचणी समजून घेणार आहेत.
विशेष म्हणजे, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील दुष्काळ निवारणासाठी १० कोटींचा निधी देण्याची घोषणा केल्यानंतर दोनच दिवसांनी राहुल गांधी यांचा हा दौरा होतोय. महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती पाऊस कमी पडल्यामुळे निर्माण झालीय... त्यामुळे हा मानवनिर्मित दुष्काळ असल्याच्या विरोधकांच्या आरोपात काहीही तथ्य नाही, असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नुकतंच औरंगाबाद इथं म्हटलं होतं.
राहुल गांधी सोमवारी जालना आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौर्यावर येणार होते. या दौर्यात ते जनावरांच्या छावण्यांना भेट देऊन दुष्काळग्रस्त शेतकर्यांशीही संवाद साधणार होते. मात्र, छत्तीसगडमध्ये काँग्रेस नेत्यांवर झालेल्या भीषण नक्षली हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांना आपला दौरा पुढे ढकलला होता.