www.24taas.com, अलाहबाद
महाकुम्भमेळ्यात नागा साधूंचा जत्था हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. पण हे नागा साधू म्हणजे नेमके असतात कोण, करतात काय आणि मुख्य म्हणजे बनतात कसे? असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडतो. नागा साधू बनवण्याची प्रक्रिया आखाड्यांमध्ये घडते. मात्र ही खूप खडतर असते.
मुळात एखादी व्यक्ती नागा साधू बनण्यासाठी आखाड्यात आल्यास तिची पार्शभूमी जाणून घेतली जाते, त्या व्यक्तीबद्दल माहिती मिळवली जाते. त्या व्यक्तीला नागा साधू बनण्याची इच्छा का आहे, हे जाणून घेतलं जातं.त्या व्यक्तीच्या परीक्षेवरून जर ती व्यक्ती नागा साधू बनण्यास योग्य आहे, असं वाटलं तरच त्याला पुढील क्रियांसाठी परवानगी मिळते.
परवानगी मिळाल्यावर त्या व्यक्तीला पुढील ३ वर्षं गुरुंची सेवा करत धर्म कर्म आणि आखाड्यांचे नियम समजवून घ्यावे लागतात. या अवधीत त्याच्या ब्रह्मचर्याची कठोर परीक्षा घेतली जाते. यानंतर जर गुरूला ती व्यक्ती नागा साधू बनण्यास योग्य वाटली, तर पुढील प्रक्रियेसाठी त्याला नेलं जातं. पुढील प्रक्रीया कुम्भमेळ्याच्या काळात सुरू होते. या परीक्षेत त्याला ब्रह्मचाऱ्यापासून महापुरूष बनवलं जातं. या काळात त्याचं मुंडण केलं जातं. तसंच १०८ वेळा गंगेत डुबकी मारावी लागते. त्यास भस्म, रुद्राक्ष, भगवी वस्त्र दिली जातात. त्या व्यक्तीसाठी पाच गुरू नेमले जातात.
या पुढील प्रक्रियेत त्याला महापुरुषापासून अवधूत बनवलं जातं. या काळात त्याच्यावर उपनयन संस्कारांसह संन्यासी जीवनाची शपथ दिली जाते. याशिवाय त्याच्या कुटुंबियांसह खुद्द त्या व्क्तीचंही त्याच्याच हस्ते पिंडदान केलं जातं. यानंतर दंडी संस्कार केले जातात. रात्रभर त्याला ओम नम: शिवायचा जप करावा लागतो.
जुन्या आखाड्यातील संस्कारांनुसार व्यक्तीला महामंडलेश्वरमध्ये विजयटा हवन केला जातो. त्यानंतर सर्वांनाच गंगेमध्ये १०८ डुबक्या माराव्या लागतात. यानंतर आखाड्याच्या ध्वजाखाली दंडी त्याग करवला जातो. यानंतर मात्र ती व्यक्ती नागा साधू बनते.
नागा साधू बनण्याची प्रक्रिया प्रयाग(अलाहबाद), हरिद्वार, नाशिक आणि उज्जैन येथील कुम्भमेळ्यात होते. प्रयागमध्ये दीक्षा घेणाऱ्यांना खूनी नागा, हरिद्वार येथे दीक्षा घेणाऱ्यांना बर्फानी नागा आणि नासिकमध्ये दीक्षा घेणाऱ्यांना खिचडीया नागा संबोधले जाते. त्यांना ही नावं केवळ त्याची दीक्षास्थानं स्पषट व्हावी यासाठी दिली जातात.