(निवृत्त) ब्रिगेडीअर हेमंत महाजन - जम्मू-काश्मीरमधील पाम्पोर येथे दहशतवाद्यांशी लढताना कॅप्टन तुषार महाजन यांना वीरमरण आलं. लष्कराच्या उधमपूर येथील मुख्यालयात तुषार यांचं पार्थिव आणलं असता त्यांच्या आईला दु:खावेग आवरता आला नाही. त्या अक्षरश: कोसळल्या आणि काही काळ त्यांची शुद्धच हरवली. या प्रसंगाला मोठ्या धीराने सामोरे जात तुषार यांचे वडील देवराज यांनी त्या माऊलीला सावरण्याचा प्रयत्न केला. यावेळी डबडबलेल्या डोळ्यांनीच देवराज यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. एकीकडे त्यांना आपला मुलगा देशसेवेसाठी गमावल्याचा सार्थ अभिमान वाटत होता.
देवराज हे निवृत्त मुख्याध्यापक आहेत. आपल्या मुलाचं हौताम्य व्यर्थ ठरू नये, एवढीच त्यांची अपेक्षा आहे. त्या कळकळीतूनच त्यांनी राजकारण्यांनी आता तरी धडा घ्यावा, असं आवाहन केलं आहे. देवरात म्हणतात "पाम्पोर येथील चकमकीत कॅप्टन पवन कुमार शहीद झाल्याची बातमी रविवारी सकाळी कानावर पडली आणि संपूर्ण दिवस मी अस्वस्थ होतो. अशी आणखी किती मुलं शहीद होणार आहेत?, हा एकच प्रश्न मनाशी सतावत होता. तोपर्यंत आपला मुलगा तुषार हाही त्याच ऑपरेशनमध्ये सहभागी आहे याची जराही कुणकुण आपणास नव्हती आणि नंतर तुषार शहीद झाल्याचं वृत्त थडकलं आणि पार हादरूनच गेलो. माझा लाडका मुलगा गमावल्याचं दु:ख होतंच पण स्वत:ला सावरलं."
"माझा मुलगा देशासाठी लढताना शहीद झाला आहे आणि त्याचा मला अभिमान आहे. हे भाग्य सर्वांनाच मिळत नाही. माझ्या मुलाने लहानपणापासूनच लष्करात जाण्याचं स्वप्न बाळगलं होतं. तो स्वत:हून त्यासाठी धडपडत होता. देशासाठी काहीतरी करावं, ही त्याची जिद्द होती. त्यामुळे मीही त्यात कधी आडकाठी आणली नाही. वयाच्या सोळाव्या वर्षीच त्याचं एनडीएमध्ये निवड झाली होती", असेही देवराज यांनी सांगितले.
दहशतवाद्यांना मारण्याचं त्याचं स्वप्नचं होतं!
लष्करात जायचं आणि दहशतवाद्यांना मारायचं हे तुषारचं बालपणापासूनचं स्वप्न होतं, असं त्यांचा वर्गमित्र सुशांत याने सांगितले. तो म्हणाला, जेव्हा आम्ही खेळण्यामध्ये दंग असायचो तेव्हा तुषार मात्र लष्करात जाण्याची स्वप्नं रंगवायचा. एवढंच काय शाळेत निबंध लिहिण्यास सांगितलं तेव्हाही त्याने याच विषयावर निबंध लिहिला. लष्करात जाऊन दहशतवाद्यांना मारायचं आहे, अशी इच्छा त्याने निबंधाच्या माध्यमातून तेव्हाच व्यक्त केली होती, असे सुशांतने पुढे नमूद केले
"किसी को रिझर्व्हेशन चाहिए तो किसी को आझादी भाई, हमे कुछ नही चाहिए, बस चाहिए अपनी रजाई"...कॅप्टन पवन कुमार यांची अखेरची पोस्ट
काळजाला हात घालणारी ही पोस्ट आहे काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी दोन हात करताना वीरमरण आलेले हरयाणातील कॅप्टन पवन कुमार यांची. देशातील ताज्या घडामोडींवर भाष्य करणारी व स्वत:ची 'मन की बात' सांगणारी ही पोस्ट पवन कुमार यांनी शेअर केलेली अखेरची पोस्ट. 'कुणाला आरक्षण हवं आहे तर कुणाला स्वातंत्र्य, आम्हाला यातलं काहीही नको. आम्हाला पाहिजे ती फक्त रजई अर्थात एखादं ब्लँकेट. जे पांघरून आम्ही शांतपणे झोप घेऊ शकू आणि आनंदात राहू शकू... असा काहीसा आशय असलेली ही पोस्ट सध्या सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. आरक्षणासाठी जाळपोळ, तोडफोड करणाऱ्या आणि सरकारी पैशांवर चालणाऱ्या विद्यापीठात 'भारत तोडो'च्या घोषणा देणाऱ्यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणाऱ्या या ओळींची देशभर चर्चा आहे.
अवघ्या २३ वर्षांचे असलेले कॅप्टन पवन कुमार मूळचे हरयाणातील जिंद येथील होते. ते स्वत: जाट कुटुंबातील होते. विशेष म्हणजे, सध्या देशविरोधी घोषणांचं व वादाचं केंद्र बनलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (जेएनयू) ते माजी विद्यार्थी होते. जेएनयूतून पदवी घेऊन तीन वर्षांपूर्वी देशसेवेसाठी ते लष्करात भरती झाले होते. अत्यंत साहसी असलेल्या पवन कुमार यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात लष्करानं हाती घेतलेल्या अनेक मोहिमांमध्ये सक्रीय सहभाग घेतला होता. डिसेंबर २०१३मध्ये डोग्रा रेजिमेंटमध्ये समावेश झालेल्या पवन कुमार हे गेल्या वर्षी जूनमध्ये स्वेच्छेनं विशेष निमलष्करी दलात सहभागी झाले होते. पुलवामा येथील एका चकमकीत जखमी झाल्यानंतरही आजारपणाची रजा घेण्यास त्यांनी नकार दिला होता. दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत त्यांना वीरमरण आले. तत्पूर्वी, गेल्या आठवड्यात त्यांनी फेसबुकवर वरील पोस्ट शेअर केली होती.
कॅप्टन पवन कुमार यांच्यावर त्यांच्या मूळ गावी हरयाणातील जिंद येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार झाला. त्यांचं पार्थिव विशेष विमानानं हरयाणा येथे आणण्यात आलं होते.
काश्मीर खोऱ्यातील परिस्थिती सुधारेल अशी अपेक्षा होती, मात्र तसे झालेले नाही. उलट काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद वाढतानाच दिसत आहे. परकीय दहशतवाद्यांचे हल्ले होतच आहेत, पण पुन्हा स्वदेशी दहशतवाद्यांची संख्या वाढू लागली आहे. तेथील वाढत्या दहशतवादी हल्ल्यांत तरुण-तडफदार लष्करी अधिकाऱ्यांचे बळी जात आहेत. पाम्पोर हल्ल्यात बळी गेलेले कॅ. पवन कुमार, कॅ. महाजन, लान्स नाईक ओम प्रकाश हे तरुण कमांडो होते. कुपवाडय़ात याच महिन्यात झालेल्या हल्ल्यात कमांडो लान्स नाईक मोहननाथ गोस्वामी शहीद झाले. जानेवारीत कर्नल एम. एन. राय हुतात्मा झाले. गेल्या नोव्हेंबरमध्ये कर्नल संतोष महाडिक यांना वीरमरण आले. अत्यंत प्रशिक्षित, जाँबाज असे हे जवान आपण सातत्याने गमावत आहोत.
राष्ट्रद्रोही कारवायांवर कडक कारवाई करा
काश्मीर राज्यातल्या दहशतवादी कारवाया मोडून काढायसाठी झुंजणार्या भारतीय सैन्याच्या जवानांना नाउमेद करण्यासाठी, 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा देणार्या पाकिस्तानवादी टोळक्यांच्या राष्ट्रद्रोही कारवायांवर कडक कारवाई व्हायलाच हवी. श्रीनगर-जम्मू महामार्गावरच्या आंत्रप्रिनरशिप डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटच्या पाच मजली इमारतीत घुसलेल्या तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खातमा भारतिय सैन्याच्या जवानांनी ४८ तासांच्या चकमकीत केला. कोणत्याही परिस्थितीत दहशतवादी पळून जाऊ नये, यासाठी भारतीय सैन्याने या परिसराला आणि इमारतीलाही घेरा घातला होता. या कारवाईत तीनही दहशतवाद्यांचे मुडदे पाडले. पण कॅप्टन पवन कुमार, पॅराकमांडो कॅप्टन तुषार महाजन आणि ओमप्रकाश, आर. के. रैना, भोला सिंह हे जवान शहीद झाले. यानी प्राणांची पर्वा न करता, चोख प्रत्युत्तर देत, त्यांना इमारतीतच कोंडल्यामुळे ही कारवाई यशस्वी झाली.
या शूरवीर जवानांच्या बलिदानाचा सार्या देशाला अभिमान वाटत असला, तरी काश्मीरमधल्या पाकिस्तानच्या तालावर नाचणार्या आणि राष्ट्रद्रोही चाळे करण्यातच दंग असलेल्या विकृतांना, मात्र या जवानांमुळेच आपले प्राण वाचले, याचे भान राहिलेले नाही. भारतीय जवान पम्पोरमधल्या त्या इमारतीत घुसलेल्या दहशतवाद्यांशी सामना करीत होते, तेव्हा याच परिसरातल्या फरेका बल, दरांग बल, कदला बल, सेमपोरा मशिदीतून ध्वनिक्षेपकावरून या अल्लाहच्या घोषणा देत विकृत राष्ट्रद्रोह्यांच्या टोळ्या पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देत होत्या. दहशतवाद्यांना मुजाहिद्दीन ठरवून, चिथावणीही दिली जात होती. 'जागो मुजाहिद्दीन जागो' , 'हमें चाहिए आझादी' अशा घोषणा मशिदींतून दिल्या गेल्या.
जम्मू-काश्मीर जनतेलाही भारतीय कायदेच लागू आहेत
शेकडो युवकही पम्पोरमध्ये सुरू असलेल्या चकमकीच्या घटनास्थळी जमवून देशविरोधी घोषणाबाजी करत होते. सैन्याच्या मोहिमेत अडथळे आणायचे त्यांचे प्रयत्न होते. पोलिसांनी लाठीमार करून आणि अश्रूधूर सोडून या युवकांना घटनास्थळावरून हाकलून लावले. पाकिस्तानी दहशतवाद्यांना पाठिंबा देणार्या आणि त्यांना मुजाहिद्दीन ठरवणार्या या युवकांच्या टोळ्यांना आणि मशिदीतून घोषणाबाजी करणार्या त्या राष्ट्रद्रोह्यांवर सरकारने कडक कारवाई करून त्यांना बेमुदत तुरुंगात डांबायला हवे. कायदा काश्मीर खोर्यातल्या दहशतवाद्यांना खुलेआम पाठिंबा देणार्या युवकांना आणि मशिदीतून पाकिस्तानचा जयजयकार करणार्या मुल्ला मौलवींसाठीही लागू असल्याने, कारवाइ केली जावी. जम्मू-काश्मीर हे राज्य भारतातलेच आहे आणि तिथल्या जनतेलाही भारतीय कायदेच लागू आहेत, हे केंद्र सरकारने कठोर कारवाईद्वारे दाखवायला हवे.
फुटीरतेला खतपाणी
पाकिस्तानच्याच चिथावणीने आणि सक्रिय मदतीने जम्मू-काश्मीर राज्यात गेली ३५ वर्षे पाकिस्तानवादी दहशतवाद्यांकडून हिंसाचाराचे सत्र सुरू आहे. या राज्याला, आपण अन्य भारतीयांपेक्षा विशेष आहोत, अशी भावना निर्माण झाली. आपण भारतीय आहोत, असे फुटीरतावादी आणि त्यांच्या टोळक्यांना, संधिसाधू राजकारण्यांना वाटत नाही. काश्मीरमधल्या जनतेला आता शांतता हवी आहे, हेही त्यांना मान्य नाही. जनतेच्या भावनांचा केंद्र सरकारने विचार करायला हवा, असे पिपल्स डेमोक्रेटिक पक्षाच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती साळसूदपणे सांगतात. त्यांचे वडील-माजी मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सैद यांनीही हाच उद्योग केला होता. हुर्रियत परिषदेचे नेते तर पाकिस्तानचे समर्थक आहेत. त्यांनीच गेल्या तीन दशकात काश्मीर खोर्यातल्या जनतेला धर्माच्या नावाखाली दावणीला बांधून फुटीरतेला खतपाणी घालायची कटकारस्थाने सातत्याने सुरू ठेवली. लोकांना वारंवार सक्तीने बंदही पाळायला लावले. लष्कराच्या प्रदीर्घ मोहिमेमुळेच काश्मीरमधला दहशतवाद आणि दहशतवादी कारवाया आटोक्यात आल्या असल्या, तरी त्या अद्यापही पूर्णपणे संपलेल्या नसल्याचेच पम्पोरच्या घटनेने उघडकीस आले आहे. अशा स्थितीत काश्मीरमध्ये लष्कराला दिलेले विशेष अधिकार काढून घ्यावेत, ही मेहबुबा मुफ्ती यांची मागणी केंद्र सरकारने मान्य केल्यास मोठा अनर्थ घडेल, याचीच ही नांदी होय!
यापूर्वीही हुर्रियतवाल्यांच्या जाहीर सभेत पाकिस्तानवादी टोळक्यांनी आयसिसचे आणि पाकिस्तानचे झेंडे फडकवले होते. जाहीर सभांतून भारताच्या निषेधाच्या घोषणा दिलेल्या होत्या. लष्कराच्या गस्ती तुकड्यांवर तुफानी दगडफेकीच्या घटनाही शेकडोंनी घडलेल्या आहेत. दगडफेक करणार्या त्या तरुणांना पाकिस्तानकडून पैसा दिला जात असल्याचे तेव्हा झालेल्या चौकशीत निष्पन्नही झाले होते.
काश्मीर खोर्यामधेच अनेक पाकिस्तानधार्जिणे लोक राहतात
अनेक भारतीयांना काश्मीरमधील सत्य परिस्थिती माहीत नाहीं. काश्मीर खोर्यामधेच (काश्मिरची २०% लोक संख्या) अनेक पाकिस्तानधार्जिणे आहेत, तिथे लहान मुले पण भारतीय तिरंग्याला किवा राष्ट्रगीताला मानत नाहीत. ते जरी भारतात असले तरी, अजून तेथील लोक भारताला आपला देश मानत नाहीत. १४ ऑगस्टला पाकिस्तानचा झेंडा फडकवला जातो. १५ ऑगस्टला भारतीय ध्वज फडकवला जात नाही. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या अंत्यविधीकरता पूर्ण शहर लोटते. ’अमर रहे’ च्या घोषणा केल्या जातात. जेव्हा सैनिक शहिद होतात, तेंव्हा अंत्यविधीस कोणीच नसते. उलट जखमी सैनिकांना घेऊन जाणार्या गाड्यांवर दगडफेक केली जाते. असे असंख्य देशद्रोही आपल्या देशामध्ये आहेत आणि मते कमी पडत आहेत म्हणून बांगलादेशातून ४-५ कोटी घूसखोरांना आपण भारतात येण्याचे आमंत्रण दिले आहे.
जशास तसे उत्तर हवे
अब्दुल रेहमान उर्फ अबू कासीम या अतिरेक्याच्या दफनविधीसाठी तब्बल ६० हजार लोक जमले होते. त्याचा दफनविधी आपल्याच भागात झाला पाहिजे असा श्रीनगरजवळील तीन खेडय़ातील लोकांचा हट्ट होता. त्यानंतर काही आठवडय़ात तत्कालीन मुख्यमंत्री मुफ्ती महमद सईद यांचे निधन झाले पण त्यांच्या दफनविधीला दहा हजार लोकसुध्दा जमले नाहीत. ही एकच गोष्ट श्रीनगरमधील जनमानस कसे बदलत चालले आहे, हे दर्शविण्यास पुरेसे आहे. पाकिस्तानी पाठिंब्याने आलेल्या जिहादी अतिरेक्यांविरुध्द कारवाई करण्यासाठी जाणाऱ्या भारतीय सैन्यावर स्थानिक लोक दगडफेक करीत होते. भारतीय जवानांच्या कारवाईत मोठय़ा प्रमाणावर अडथळे आणणाऱ्या पाकधार्जिण्या तरुणांच्या हातात पाकिस्तानी राष्ट्रध्वज होतेच. काश्मिरी खोऱ्यातील जनतेची मानसिकता बदलायला तयार नाही, हे भारतीय जवान पाम्पोरमध्ये अतिरेक्यांशी कडवी झुंज देत असताना आजूबाजूच्या मशिदींमधून त्या अतिरेक्यांना पाठिंबा देणाऱ्या घोषणांच्या गजरांतून स्पष्ट झाले आहे. केंद्र सरकारने पम्पोरच्या कारवाईच्या वेळी दहशतवाद्यांचे उघड समर्थन करणार्या राष्ट्रद्रोह्यांवर कडक कारवाई केली नाही, तर त्यांना अजून चेव चढेल. काश्मिरी विद्यार्थ्यांनी दिलेल्या ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या नार्यांचा, त्यांच्यावर कायद्यानुरूप कारवाईच केली जायला हवी. खबरदार! असा इशारा देत काश्मिरी कुरापतखोरांना बेनकाब करण्याची कठोर कारवाई झाली, तरच भविष्यातील अशा घटनांपासून भारताला मुक्ती मिळू शकेल.
पाकिस्तानी अतिरेक्यांना काही घरभेद्यांची मदत
मुफ्ती महमद सईद यांची पीडीपी असो किंवा ओमर अब्दुल्ला यांची नॅशनल काँग्रेस असो, त्यांनी काश्मीरमध्ये सत्ता उपभोगली. ऐशोराम केले पण या प्रदेशाच्या मुलभूत विकासाकडे लक्षच दिले नाही. गुरूदासपूर- पठाणकोट- पाम्पोर येथील अतिरेकी कारवायांमध्ये आणखी एक सूत्र दिसू लागले आहे. पाकिस्तानी सशस्त्र अतिरेक्यांना काही घरभेद्यांची मदत मिळू लागली आहे .याचा कसून छडा लावण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
आपल्याच देशाच्या दुसऱ्या एका भागात रोजच्या रोज भारतीय राष्ट्रध्वजाची विटंबना होते आहे, भारतविरोधी घोषणांनी तिकडचे आसमंत प्रदुषित होत आहे, याचा आपल्या सर्वांना संताप यायला हवा.
गुप्तचर यंत्रणा आधिक कार्यक्षम करून हल्ले होण्याआधीच दहशतवाद्यांचा त्यांच्या तळावर जाऊन खातमा करण्याची व्यूहनीती आखण्याची गरज आहे. दहशतवादी हल्ल्यांना भारताकडून जशासतसे नव्हे तर अधिक आक्रमक उत्तर मिळणार नाही तोवर सीमेपलीकडून होणारे हल्ले थांबण्याची शक्यता नाही.