किरण खुटाळे: मला राजकारण माहित नाही, कळत नाही किंवा राजकारणात रस नाही असं म्हटलं तरी महायुतीत आज जे काही घडतंय ते पहाता, हे असं घडेल अशी सुतरामही शक्यता निदान माझ्या सारख्या पत्रकाराला
आणि सुजाण मतदाराला तरी वाटली नव्हती. उद्धव ठाकरेंच्याच शब्दात सांगायचं तर हाता-तोंडाशी आलेला सत्तेचा घास असा धुडकावून लावण्याचं पाप कोण कशाला करेल? गेल्या आठ दिवसात जे काही पाहिलं, ऐकलं, समजलं त्यातून एक गोष्ट आज मनात आली की ‘हीच ती वेळ...’
होय जे भल्या भल्यांना जमलं नाही ते साध्य करण्याची हीच ती वेळ... जणू विधात्यानेच हे सगळं घडवून आणलं असावं, असाही एक विचार मनात येऊन गेला. युती तुटणार… तुटली यावर अजूनही विश्वास बसत नाही... पण जो विचार मनात आला तो याच तुटली… तुटणार मुळे... हीच ती वेळ सर्वात मोठं होण्याची… उभ्या महाराष्ट्राची मने जिंकण्याची, बाळासाहेबांबरोबरच शिवसैनिकांची, मनसैनिकांची आणि हजारो लाखो मराठी मनातली ती इच्छा पूर्ण करण्याची… राज्याचं नव्हे तर देशाचं राजकारण ढवळून काढण्याची... जे कोणाला जमलं नाही ते घडवून आणण्याची... ‘मी’ तुझ्याकडे येऊ की तू ‘माझ्या’कडे ये यापासून दूर होऊन ‘आपण’ होण्याची... होय... जर ती वेळ कधी असेल तर ती हीच, पुढची पाच वर्ष राज्य करण्यासाठी नव्हे तर पुढच्या पिढ्या घडवण्यासाठी... आपल्या घरात आपण कितीही भांडलो तरी आपण आपलं राहण्याची...
ज्या एका माणसाला देशभरातल्या मीडियाने उचलून कधी हिरो, कधी व्हिलन केलं त्याला आता ही संधी चालून आलीय सर्वांपेक्षा मोठं होण्याची... इतिहास रचण्याची... एकत्र येण्याची...
चार महिन्यांपूर्वी ज्या लाटेवर स्वार होऊन देशात इतका मोठा बदल घडला त्या लाटेवर स्वार होऊन ‘भाजप’ला सत्तेत स्थान मिळालं... तीच लाट आज महाराष्ट्रात आहे असं म्हटलं तर? मराठी मनाला हे पटेल? मराठी माणूस काय करेल? दुसरा पर्याय नाही म्हणून आणि गुजरातचं उदाहरण डोळ्यासमोर ठेऊन देशातही तसाच विकास घडवण्यासाठी जनतेनं सत्तापालट घडवत भाजपच्या पदरात एकहाती सत्ता दिली... पण महाराष्ट्रात ते शक्य नाही... काँग्रेस असो, राष्ट्रवादी, भाजप असो की शिवसेना एकहाती सत्ता मिळवण्याचं स्वप्न आजच्या तारखेला तरी शक्य नाही... आणि हे न कळण्या इतकं कोणताही पक्ष, पक्षप्रमुख, पक्षाध्यक्ष दुधखुळा नाही... मग असं का? निव्वळ 10-15 जागांसाठी, त्या जागांसाठी ज्या तुमच्याकडे नाहीत, येतील की नाही याचीही खात्री नाही, शक्यताही नाही... मग का? मुख्यमंत्रीपदासाठीच... मुख्यमंत्री कोण होणार? या यक्ष प्रश्नाचं उत्तर हेच या रस्सीखेचामागचं गमक. मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न तर सर्वांना पडतंय पण ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी जो डोंगर उपसावा लागणार आहे त्याचं काय? तो कसा उपसायचा? आणि तो एकट्यानं उपसणं निव्वळ अशक्य...
गेल्या आठ दिवसांत मनसे, राज ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणात आहेत की नाही असा प्रश्नच पडावा... अवघ्या महिन्याभरात निवडणुका होऊ घातल्या असताना, राज ठाकरेंची एक बातमी सोडा साधी चाहूलही नाही? नक्की काय खिचडी शिजतेय... कोणाची सत्ता येणार... कोण मुख्यमंत्री होणार... कोण कोणाबरोबर युती आणि कोण कोणाशी आघाडी करणार... मतदार राजा काय करणार... असंख्य प्रश्न, आणि या सर्व प्रश्नांना एक चाबूक उत्तर...
राज-उद्धव एकत्र... फक्त विचारानेच राजकारणच नाही तर अर्थकारण, समाजकारण सगळी कारणं ढवळून निघाल्यासारखी दिसू लागतायत... मोदींपासून ते सोनिया गांधीपर्यंत, राहूलपासून ते पवारांपर्यंत सर्वांच्या पायाखालची जमीन हादरणार नाही? कदाचित नाही पण एका राज्यासाठी... एका विश्वासासाठी... त्या एका वाघाच्या त्या एका इच्छेसाठी हीच ती वेळ...आणि हाच तो क्षण...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.