फिल्म रिव्ह्यू :`द अटॅक्स ऑफ २६/११`... जिवंत कथा!

‘हा सिनेमा म्हणजे एकप्रकारे त्या दशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्यांना श्रद्धांजली आहे’ असं रामगोपाल वर्मा यांनी आधीच स्पष्ट केलंय आणि खरोखरच या सिनेमाला ‘त्या’ घटनेशी निगडीत असलेल्या भावनांनी जोडण्यात ते यशस्वीही झालेत.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Mar 1, 2013, 11:42 AM IST

www.24taas.com, मुंबई
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला... २६/११/२००८... संपूर्ण देशालाच हादरवून टाकणाऱ्या या घटनेनं सारेच सुन्न झाले. या हल्ल्याशी प्रत्यक्षात संबंध आलेल्या आणि प्रत्यक्षात संबंध न येऊनही त्या घटनेचा पुरेपुर अनुभव घेणाऱ्या प्रत्येकाच्याच मनात हल्ल्याच्या क्रूरतेच्या आठवणी आजही ताज्याच आहेत. याच पटकथेला घेऊन रामगोपाल वर्मा यांनी ‘द अटॅक्स ऑफ २६/११’ या सिनेमाच्या माध्यमातून ‘त्या’ भयानक आठवणी पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न केलाय.


दिग्दर्शक : राम गोपाल वर्मा
कलाकार : नाना पाटेकर, संजीव जयस्वाल

‘हा सिनेमा म्हणजे एकप्रकारे त्या दशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्यांना श्रद्धांजली आहे’ असं रामगोपाल वर्मा यांनी आधीच स्पष्ट केलंय आणि खरोखरच या सिनेमाला ‘त्या’ घटनेशी निगडीत असलेल्या भावनांनी जोडण्यात ते यशस्वीही झालेत. या सिनेमात मराठमोळा अभिनेता नाना पाटेकर यांनी मुंबई मुंबईचे तत्कालीन संयुक्त पोलीस आयुक्त राकेश मारिया यांची भूमिका निभावलीय.

मुंबईवर अचानक झालेल्या दहशतवादी हल्ल्यानं चिंतित झालेल्या राकेश मारिया यांच्या रुपात नाना या हल्ल्यातील घटनांची चौकशी सुरु करतो आणि उलगडत जाते ‘त्या’ हल्ल्यातील भयानकता आणि क्रूरता... हे दहशतवादी मुंबईच्या किनाऱ्यापर्यंत पोहचलेच कसे? जास्तीत जास्त लोकांना मारण्याच्या शपथा घेऊन, स्वत:च्या जीवावर उदार होऊन निघालेल्या ‘त्यांनी’ हा प्लान आखला कसा? आणि या शस्त्रधारी दहशतवाद्यांशी मुंबई पोलिस आणि सरकार कसा मुकाबला केला… हा प्रसंग वर्मा यांनी पडद्यावर उभा केलाय.
वेगवेगळ्या घटना एकत्रित जोडण्यासाठी आणि कथेतील ताळतम्य कायम राखण्यासाठी वर्मा यांचा हा सिनेमा अनेकदा ‘फ्लॅशबॅक’मध्ये जातो. वास्तव आणि सिनेममधील कथेत सामंजस्य राखण्याचं काम वर्मा यांनी मोठ्या खुबीनं पार पाडलंय. वर्मा यांनी २६/११ हल्ल्यापासून ते कसाबच्या फाशीपर्यंत अनेक घटनांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केलाय. दहशतवादाच्या विविध कंगोऱ्यांनाही सिनेमातून समोर आणण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. दहशतवादाचा क्रूर चेहरा प्रेक्षकांसमोर उभं करण्यात रामगोपाल वर्मा यशस्वी झालेत असंच म्हणावं लागेल.

सिनेमातील सगळ्याच कलाकारांनी उत्कृष्ट अभिनय केलाय. अजमल कसाबच्या भूमिकेत दिसणाऱ्या संजीव जयस्वाल यानंही आपला उत्कृष्ट परफॉर्मन्स दिलाय. संजीवचा हा पहिलाच सिनेमा... पण, आपली भूमिका तेवढ्याच क्रूरतेने लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी तो यशस्वी झालाय. नानाच्या अभिनयाबाबत लोकांना बोलण्यासाठी तो काही ठेवतच नाही!, असंच पुन्हा एकदा म्हणावं लागेल. चांगल्या भूमिका मिळाल्या तर तो कुठेही कमतरता ठेवत नाही, हेच नानाचं विशेष.
मागच्या वर्षी बरेच फ्लॉप सिनेमे प्रेक्षकांसमोर आणून पिछाडीवर गेलेल्या रामगोपाल वर्मांनी यावर्षी मात्र ‘द अटॅक्स ऑफ २६/११’ या सिनेमातून जोरदार कमबॅक केलंय असं म्हणायला हरकत नाही. वर्मा यांनी आपला हातखंडा असलेला जुनाच मार्ग पुन्हा एकदा निवडलाय.