www.24taas.com,पुणे
मराठी सिनेविश्वावर शोककळा पसरवणारी घटना आज घडली. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर झालेल्या भीषण अपघातात प्रसिद्ध अभिनेते आनंद अभ्यंकर आणि अभिनेता अक्षय पेंडसे यांचं निधन झालं. दुपारी वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
चित्रपटाचे शुटींग संपवून मुंबईला परतत असताना पुणे-मुंबई महामार्गावर काळाचा घाला घातलेल्या अभिनेते आनंद अभ्यंकर, अक्षय पेंडसे आणि अक्षय यांचा मुलगा प्रत्युष यांच्यांवर वैकुंठ स्मशानभूमीत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या शेकडो चाहत्यांची तसेच मराठी कलाकारांची मोठी उपस्थिती होती. या दोघांच्याही निधनानं रंगभूमी आणि सिनेविश्वावर शोककळा पसरलीय.
मराठी कलाकार सुनील बर्वे, उमेश कामत, प्रसाद ओक, जितेंद्र जोशी, अंकुश चौधरी, पुष्कर श्रोत्री, सुधीर गाडगीळ, हर्षदा खानविलकर तसेच मला सासू हवीय या मालिकेतील टीम अंत्यसंस्काराच्यावेळी उपस्थित होती. यावेळी पुष्कर श्रोत्री, आसावरी जोशी यांना आपले दु:ख आवरता आले नाही.
`कोकणस्थ` चित्रपटाचे रविवारी चित्रीकरण झाले. आनंद अभ्यंकर, अक्षय पेंडसे आणि त्यांचे कुटुंबीय शुटींग संपवून रात्री मुंबईला जात होते. बऊर गावानजीक रविवारी बारा वाजण्याच्या सुमारास टेम्पोने दुभाजक ओलांडून आनंद अभ्यंकर यांच्या कारला जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांचे निधन झाले होते.