www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
सिनेमा : सत्याग्रह
दिग्दर्शक : प्रकाश झा
कलाकार : अमिताभ बच्चन, अजय देवगन, मनोज वाजपेयी, करीना कपूर खान, अर्जुन रामपाल, अमृता राव
वेळ : १५२ मिनिटे
राजनैतिक मुद्यांवर सिनेमा बनवण्यासाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक प्रकाश झा यांचा बहुचर्चित ‘सत्याग्रह’ अखेर पडद्यावर झळकलाय. भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी प्रवृत्त करणारा हा सिनेमा अनेकांना आपल्याकडे आकर्षित करण्यात यशस्वी ठरलाय. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर याआधीच देशात रान उठलंय त्यामुळे हा सिनेमा हिट ठरण्याचा अंदाज अनेक सिनेसमीक्षकांनी व्यक्त केलाय.
सिनेमाचं कथानक
‘सत्याग्रह’ हा सिनेमा भ्रष्टाचाराविरुद्ध लढणाऱ्यांची कथा समोर उभी करतो. सेवानिवृत्त झालेले प्राध्यापक द्वारका आनंद (अमिताभ बच्चन) यांना आपल्या देशाला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून सोडवायचंय. स्वत:चं जीवन त्यांनी आपल्या सिद्धांतावर व्यतीत केलंय. मानव राघवेंद्र (अजय देवगन) दिल्ली मध्ये आपला व्यापार चालवतोय. तोही भ्रष्टाचाराविरुद्ध कोणतीही संकटं झेलण्यासाठी तयार आहे. मात्र, मंत्री बलराम सिंहला (मनोज वाजपेयी) केवळ सत्तेतच रस आहे. राजवंशी सिंह (अर्जुन रामपाल) गल्लीबोळांतल्याच राजकारणात अडकून पडलाय. यास्मीन (करीना कपूर खान) एक महिला शोध पत्रकाराच्या भूमिकेत दिसते. लोकांपर्यंत सत्य उघड करणं ती स्वत:च कर्तव्य समजते.
एके दिवशी अचानक एका दुर्घटनेत द्वारका यांच्या मुलाचा – अखिलेशचा मृत्यू होतो. अखिलेश याच्या पत्नीची - द्वारका आनंद यांच्या सुनेची भूमिका अमृता सिंह हिनं निभावलीय. मंत्री बलराम अखिलेशच्या पत्नीला नुकसान भरपाई देण्याची घोषणा करतो. परंतु, घोषणेनंतर तीन महिन्यानंतरही तिला ही नुकसान भरपाई मिळत नाही तेव्हा ती कलेक्टर ऑफिसमध्ये दाखल होते आणि इथूनच सुरू होते भ्रष्टाचाराविरुद्ध लढाई...
प्रकाश झा यांचा सिनेमा
याअगोदर प्रकाश झा यांनी याच मुद्द्यांना घेऊन राजनीति आणि गंगाजल हे दोन सिनेमे बनविले होते. हे दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर चांगलेच चालले होते.
अभिनयासाठी दाद द्यायलाच हवी
महानायक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमिताभ बच्चन यांनी आपल्या भूमिकेत जीव ओतलाय. अमिताभ बच्चन यांची भूमिका सिनेमाघरांतून बाहेर पडल्यानंतरही दर्शकांच्या डोक्यात फिरत राहते. नेहमीप्रमाणेच आपल्या भूमिकेत अजय देवगन उठून दिसतो. मनोज वाजपेयीनंही भ्रष्ट नेत्याच्या भूमिकेला पूरेपूर न्याय दिलाय. करीना कपूर, अर्जुन रामपाल यांनीही आपल्या भूमिका उत्तम निभावल्यात.
सिनेमा कुठे कमी पडतो?
प्रकाश झा यांचा सिनेमा कथानक आणि डायरेक्शनमध्ये थोडाफार मार खातो. पण, कलाकारांच्या उत्तम अभिनयामुळे कथानक पुढे सरकणं थोडं फार सुखद ठरतं.
सिनेमामध्ये अण्णांचं आंदोलन, लोकपाल बिल, अरविंद केजरीवाल यांच्या राजकीय पक्षाचा उद्य, इंजिनिअर सत्येंद्र दुबे हत्या प्रकरण अशा काही सत्य घटनाचं प्रतिबिंब दिसतं. यामध्ये प्रकाश झा यांनी जबरदस्तीनं नाटकीय प्रेम, आयटम नंबर आणि इतर काही गोष्टी ठासून भरलेल्या दिसतात. त्यामुळे हा सिनेमा ना वास्तविक वाटतो ना मनोरंजक...
शेवटी काय तर…
शेवटी काय तर तुम्हाला तुमच्या आवडत्या कलाकारांचा उत्तम पाहायचा असेल आणि दाद द्यायची असेल तर जरुर हा सिनेमा पाहायला जा... सत्य घटनांवर आधारीत सिनेमा म्हणून काहीतरी स्फूर्ती घेण्याच्या विचारात जाल तर तुमचा निराशाच जास्त होईल.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.