www.24taas.com , झी मीडिया, मुंबई
एखाद्या क्रिकेटरला स्वप्नवत वाटावं असं मास्टर ब्लास्टरचं करियर... १४ ऑगस्ट १९९०ला ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानावर अवघ्या १७ वर्षाच्या सचिन रमेश तेंडुलकरनं दमदार खेळी खेळत टेस्ट मॅचमध्ये सेंच्युरी लगावली आणि पराभवाच्या काठावर असलेल्या मॅचला अनिर्णित अवस्थेत आणलं. याच सचिनच्या टेस्ट मॅचमधल्या पहिल्या सेंच्युरीला आज २३ वर्ष पूर्ण झालीयेत.
अवघी पाच फूट पाच इंच एवढी उंची असलेला सचिन माल्कम आणि फ्रेजर यांच्या उसळत्या बॉल्सचा धैर्यानं सामना करत होता. त्यानं ऑनसाईड आणि कव्हरमधून मारलेले चौकार हे प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहिले. सचिननं ही पहिली सेंच्युरी अवघ्या १७व्या वर्षी पूर्ण केली. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात शतक करणाऱ्या मुश्ताक अहमद यांच्यापेक्षा सचिन त्यावेळी फक्त एका महिन्यानं मोठा होता. सचिनला त्यावेळी मिळालेला ‘मॅन ऑफ द मॅच’ किताबही पहिलाच होता.
सचिनच्या या पहिल्या सेंच्युरीला आज 23 वर्षे पूर्ण होत आहेत. तेव्हा भारतासमोर विजयासाठी 408 रन्सचं आव्हान होतं आणि समोर डिवॉन माल्कम, अँगुस फ्रेजर आणि एडी हेमिंग्ज असे दिग्गज बॉलर. बॅटिंगसाठी उतरलेल्या सचिननं या बॉलर्सचा सामना करत सेंच्युरी लगावली. त्यावेळी सचिन बरोबर मैदानात कप्तान मोहम्मद अझरूद्दीन होता. सचिनच्या कारकिर्दीतील ती नववी टेस्ट मॅच होती. अझरूद्दीनही 11 धावांवर बाद झाला आणि भारताची 5 बाद 127 अशी अवस्था झाली. सचिनच्या या खेळीनं प्रभावित झालेल्या लिटील मास्टर सुनील गावसकर यांनी आपले आवडते पॅड्स सचिनला भेट म्हणून दिले होते.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.