www.24taas.com, हैदराबाद
सुपर संडेच्या सुपर मॅचमध्ये सनरायझर्स हैदराबादने सुपर ओव्हरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पाच धावांनी पराभव केला. सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने सहा चेंडूत २० धावा काढल्या होत्या. पण बंगळुरूला फक्त १५ धावा काढता आल्या. सामन्यात सुरूवातीला बंगळुरूने आठ गड्यांच्या मोबदल्यात १३० धावा काढल्या. हैदराबादने ७ गडी गमावून १३० धावा काढून सामना बरोबरीत आणला.
हैदराबादकडून अक्षत रेड्डी (२३) व हनुमा विहारीने नाबाद ४४ धावा काढल्या. पार्थिव (२) बाद झाला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या बंगळुरू संघाची सुरुवात निराशाजनक झाली. या सामन्यात सलामीवीर क्रिस गेल (१) आणि तिलकरत्ने दिलशान (५) बाद झाले. गेलला हनुमा विहारीने पार्थिव पटेलकरवी झेलबाद करून पॅव्हेलियनमध्ये पाठवले. दिलशानला ईशांतने त्रिफळाचीत केले.
आठ धावांवर दोन गडी गमावणाऱ्या बंगळुरूचा डाव कर्णधार विराट कोहली आणि मोझेक हेनरिक्सने सावरला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ४३ धावांची भागीदारी केली. यामध्ये तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या कोहलीने ४६ धावा काढल्या. त्याने ४४ चेंडूत पाच चौकार आणि एक षटकार ठोकला. ऑस्ट्रेलियाच्या ऑलराउंडर हेनरिक्सने ४० चेंडूत पाच चौकारांच्या साह्याने ४४ धावा काढल्या. त्याला ईशांतने शेवटच्या षटकात व्हाइटकरवी झेलबाद केले. हैदराबादच्या ईशांत शर्माने चार षटकात २७ धावा देत तीन बळी घेतले.
-