www.24tass.com, झी मीडिया, श्रीनगर
भारतीय क्रिकेट टीममध्ये स्थान मिळवणारा जम्मू-काश्मीरचा पहिला क्रिकेटर परवेज रसूल याला झिम्बाव्वे दौऱ्यात संधी न मिळाल्यानं मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला चांगलेच नाराज झालेत. कम ऑन बीसीसीआय आपली योग्यता सिद्ध करण्याची परवेझला संधी तरी द्या, अशी मागणीच अब्दुल्ला यांनी सोशल नेटवर्किंग साईटवर केली.
ओमर अब्दुल्ला हे नेहमीच काही ना काही कारणानं चर्चेत राहत असतात. त्यानंतर आता पुन्हा एकदा आपलं काश्मीरप्रेम दाखवण्यासाठी ओमर यांनी परवेझची कड घेतली आहे.
झिम्बाब्वे दौर्या साठी निवडण्यात आलेल्या १५ सदस्यामध्ये रसूल हा अंतिम संघात संधी न मिळालेला एकमेव खेळाडू आहे. संपूर्ण दौऱ्यात रसूलला मात्र बेंचवर बसून प्रेक्षकाची भूमिका बजवावी लागली. पाचव्या वनडेआधी जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी बीसीसीआयकडे रसूलला संधी देण्याची विनंती केली होती. पण तरीदेखील संधी न मिळाल्यामुळं मुख्यमंत्री आता चांगलेच खवळले आहेत.
परवेजला झिम्बाब्वे दौर्यारवर काय फक्त त्याचं खच्चीकरण करण्यास नेण्यात आलं होतं का? परवेजला झिम्बाब्वेत एकाही सामन्यात संधी न दिली गेल्यामुळं मी खूप निराश आहे, अशी जळजळीत प्रतिक्रियाच त्यांनी व्यक्त केली.
रसूल आधी जम्मू-काश्मीरचा आबिद नबी, सुरेंद्रसिंग आणि अब्दुल कय्युम यांची राष्ट्रीय संघात निवड झाली होती. परंतु त्यांना कधीही भारताच्या अंतिम संघात खेळण्याची संधी मिळाली नव्हती.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.