दीपावली मनाये सुहानी....(अनुभव)

लालबाग-परळसारख्या गिरणगावात दिवाळीचा जल्लोष काही औरच असायचा... भूतकाळातील त्या सोनेरी क्षणांच्या आठवणी...

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Nov 4, 2013, 03:32 PM IST

.
.


उठा, उठा... दिवाळी आली...
मोतीस्नानाची वेळ झाली...

टीव्हीवरची ही जाहिरात पाहिली आणि मला आमच्या जुन्या घरांची आठवण आली... एक घर शिवडीचं आणि दुसरं परळ भोईवाड्यातलं... दोन्ही बैठी घरं... आमच्या घरी कुणी अलार्म काका यायचे नाहीत... पहाटे पहाटे भांड्यांचा आवाज सुरू झाला की, कळायचं नळाला पाणी आलंय. दिवाळीच्या दिवसात सकाळी सकाळी पाच-साडे पाचला बीएमसीच्या नळाला पाणी यायचं. तेव्हा घरात नळ वगैरे चैन नव्हती. घरासमोरच्या गल्लीत एक सार्वजनिक नळ असायचा. त्याला पाणी यायचं. मग आम्हा सगळ्या कच्चाबच्चांना बायाबापड्या धो धो नळाखाली बुचकळून काढायच्या. तीच आमची पहिली आंघोळ... उटणं वगैरे अंगाला फासून थंडगार पाण्याखाली आंघोळीला बसावं लागायचं. थंडीत कुडकुडत आंघोळ करायची... मग डाव्या पायाच्या अंगठ्यानं कारेटं फोडायचं. कडू कडू कारेट्याच्या दोन-तीन बिया खायच्या. कसंनुसं व्हायचं. एखादी बी डोक्याला लावायची. नवीन कपडे घालायचे आणि फटाके फोडायला रस्त्यावर जायचं...
एव्हाना उजाडलेलंही नसायचं. कच्चेलिंबू असल्यानं फुलबाजे, पाऊस, चक्र आमच्या वाट्याला यायचे. त्यातही ज्याच्याकडे लवंगी बार असायचा, तो मोठ्ठा. हे लवंगी बारही एकदम वाजवायचे नाहीत, तर एक एक लवंगी वेगळी काढून वाजवायची... कधी कधी लवंगी पेटायची नाही, अशा लवंग्या आम्ही गोळा करायचो... त्यांची पावडर काढायचो आणि मग ती पेपरवर घेऊन जाळायचो. ज्याच्याकडं लक्ष्मी बार किंवा डबल बार असेल तो आणखी भाव खायचा. मोठ्ठी पोरं एटम बॉम्ब फोडायची. त्यातही वेगवेगळे प्रकार असायचे. म्हणजे पिठामध्ये बॉम्ब लावायचा.. म्हणजे तो फुटल्यावर सिनेमात कशा ज्वाळा येतात, तसा फिल यायचा. काही अतिहुश्शार पोरं नारळाच्या करवंट्या घ्यायची. करवंटीच्या डोळ्यातून वात वर काढायची आणि एटम बॉम्ब फोडायचे... मला आठवतं एकदा पद्या नावाच्या एका मित्राने करवंटीत असाच बॉम्ब लावला. पण बॉम्ब काही फुटलाच नाही. म्हणून जवळ जाऊन तो बघायला गेला आणि.... आणि अचानक बॉम्ब फुटला. करवंटीचे तुकडे थेट डोळ्यात गेले. त्याचा अख्खा डोळा बाहेर आला होता... त्याला तसंच केईएममध्ये नेलं. बिच्चारा पद्या, त्याचा एक डोळा कायमचा बाद झाला...

आम्ही शिवडीला राहत असताना तिथं एक ए वन मित्र मंडळ होतं. ते दीपोत्सव साजरा करायचे. लक्ष्मीची मूर्ती आणून तिची प्रतिष्ठापना करायचे. रात्री रस्त्यावर मोठ्या पडद्यावर सिनेमा लावायचे. प्रोजेक्टर लावून. रस्त्यावर पाटावर किंवा बारदानावर बसून सिनेमा पाहण्याची गंमत असायची. सिनेमा सुरू होण्यापूर्वी ऑपरेटर फोकस एडजस्ट करायचा. त्या प्रकाशझोतामध्ये आम्ही उड्या मारून मारून, किमान आपला हात तरी पडद्यावर दिसेल म्हणून धडपडायचो. पडद्याच्या दोन्ही बाजूने सिनेमा पाहता यायचा. प्रोजेक्टरच्या बाजूने सिनेमा पाहिला की चित्र नीट दिसायचे. पण दुस-या बाजूला बसलो की, धम्माल यायची. म्हणजे हिरो उजव्या हातानं ढिश्शूम ढिश्शूम करायचा, पण आम्हाला तो डावखुरा दिसायचा. हिरोईन साडी नेसली असेल तर ती गुजरातीण वाटायची...
मी आठवीत होतो तेव्हा आम्ही शिवडीचं घर विकलं आणि परळ भोईवाड्यात राहायला आलो. तेव्हा जरा मोठा झालो होतो. नवी मित्र व्हायला वेळ लागला. पण तिथेही हळुहळु रूळायला लागलो. सुभाषदादा नावाचा एक हुश्शार मुलगा आमच्यात मोठा होता. मुलांसाठी तो घरगुती क्लास चालवायचा. त्याचा शब्द म्हणजे आमच्यासाठी अंतिम असायचा. अकरावी-बारावीचा काळ असेल. एका दिवाळीच्या सुट्टीत सुभाषदादाने नवीन टूम काढली. सुट्टीत सकाळी लवकर जॉगिंगला जायचे. त्यामुळे थोडाफार व्यायाम होईल, ही त्यामागची कल्पना. शिवाय सकाळी उजाडल्या उजाडल्या अपना बाजार समोरच्या सदाकांत ढवण मैदानात गेलं की, क्रिकेट खेळायला पीचही अडवता यायचे. सुरूवातीला चांगला उत्साह होता. पण लवकर उठणं जीवावर यायचं. सुभाषदादा अलार्मकाकासारखा प्रत्येकाचा दरवाजा ठोठवायचा. मग नाइलाजाने उठायला लागायचं. दाढी (त्याचं नाव संजय, पण एकदा खेळताना तो पडला आणि हनुवटीला टाके पडून पट्टी लावली, तेव्हापासून त्याचं दाढी नाव पडलं ते आजतागायत...) मात्र रोज न चुकता यायचा.. एन्जॉय करायला. तो जॉगिंगला एन्जॉय म्हणायचा. तर दाढी न चुकता जॉगिंगला यायचा. आम्ही सगळे मैदानाभोवती फे-या मारायचो आणि हा सगळ्यांची नजर चुकवून मैदानाच्या कठड्यावर जाऊन झोपायचा. काही दिवसांनी आमच्या लक्षात आलं की, दाढी मध्येच गायब होतो. एकदा आम्ही कारण विचारलं. तेव्हा त्याने