माथेरानमध्ये स्पोर्ट्स कार्सचा धुडगूस

माथेरानच्या डोंगरावर अवैध कार रेसिंग स्पर्धा भरवण्यात येतायत. या रेसिंगच्या नावाखाली सुमार सत्तर वाहनांनी माथेरानमध्ये धुडगूस घातल्याचं उघड झालंय. वनखात्यानं याप्रकरणी सत्तर वाहनं जप्त केली आहेत.

Updated: Jul 15, 2012, 08:26 PM IST

अमोल पाटील, www.24taas.com, माथेरान

माथेरानच्या डोंगरावर अवैध कार रेसिंग स्पर्धा भरवण्यात येतायत. या रेसिंगच्या नावाखाली सुमार सत्तर वाहनांनी माथेरानमध्ये धुडगूस घातल्याचं उघड झालंय. वनखात्यानं याप्रकरणी सत्तर वाहनं जप्त केली आहेत.

माथेरान डोंगरावरच्या पठारावर काही धनिकांनी वाहनांची जीप रेसिंग स्पर्धा भरवली होती. माथेरानच्या जंगलामध्ये झालेल्या या स्पर्धेला वनखात्याची परवानगी घेतली नसल्याचं उघड झालंय. माथेरानचं जंगलाचा इको सेन्सेटीव्ह झोनमध्ये समावेश होतो. त्यामुळे या प्रकाराची गंभीर दखल घेण्यात आली आहे. वन विभागानं सत्तर गाड्या जप्त केल्या आहेत. तसंच प्रत्येक वाहनामागे हजार रुपये दंड आकारण्यात आलाय.

गेले काही महिने या परिसरात अशा प्रकारच्या अवैध कार रेसिंग स्पर्धा  भरवल्या जात असल्याचं समोर येतंय. त्यामुळे इतके दिवस वनखातं काय करत होतं. असा प्रश्न उपस्थित केला जातोय. ज्या हॉटेलमध्ये यासंबंधातला पंचनामा सुरू होता, त्या हॉटेलमध्येही मीडियाला मज्जाव करण्यात आला. त्यामुळे या प्रकरणी कुणाचा दबाव आहे का, याबद्दलचं गूढ वाढलंय.