www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
प्रेम, प्रेमाचा संघर्ष आणि नंतर हॅपी एन्डिंग आपण नेहमी बॉलिवुडच्या चित्रपटातून पाहतो. या आठवड्यात प्रेमाची एक वेगळी गोष्ट घेऊन आलेत दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवानी. प्रेमकथा तर सगळ्याच सारख्या असतात. मात्र लूटेराची प्रेमकहाणी बॉलिवुडच्या भाषेत ‘थोडी हटके’ आहे.
चित्रपटाचे कथानक
या चित्रपटातील काळ आहे १९५३चा. पश्चिम बंगालमधील मणीपूरमधील ही गोष्ट. पाखी (सोनाक्षी सिन्हा) एक सुंदर मुलगी आपल्या वडिलांसोबत त्या गावात राहत असते. पाखीचे वडील आहेत जमीनदार. वरुण श्रीवास्तव (रणवीर सिंग) आणि त्याचा मित्र देव (विक्रांत) हे दोघेही चोर आहेत. छोट्या मोठ्या घरांमध्ये चोरी करणे हे त्यांचे काम. लोकांना लुटण्याच्या निमित्ताने ते मणीपूरमध्ये येतात. गावात आल्यानंतर पाखी आणि वरुण एकमेकांच्या प्रेमात पडतात. त्या दोघांचे लग्नही ठरते, मात्र त्याचवेळी हा वरुण त्यांच्या साखरपुड्यदिवशी पाखीच्या वडिलांची सगळी संपत्ती घेउन पळून जातो. हा धक्का सहन न झाल्याने पाखीच्या वडिलांचा मृत्यू होतो. परंतु, पुन्हा एकदा संयोगाने पाखी आणि वरुणची भेट होते आणि त्यानंतर सुरु होते एक रोमांचक कहाणी.
चित्रपटातील विशेष
कथानक जरी धिम्या गतीने पुढे सरकरत असले तरी प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची ताकद या कथानकात आहे. प्रेमावर आधारित हा सामान्य विषय असला तरी त्या प्रवासात प्रेक्षकांना शेवटपर्यंत कायम राहावेसे वाटते. दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवानी यांनी या कथेची मांडणी फारच सुंदर पद्धतीने केली आहे. सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत कहाणी कुठेही रटाळ वाटत नाही.
अभिनय
बरुण चंदा ज्यांनी या चित्रपटात पाखीच्या वडीलांची भूमिका केलीय त्यांचा अभिनय उत्तम आहे. तसेच महत्त्वाच्या भूमिकेमध्ये असलेले सोनाक्षी आणि रणवीर यांचाही अभिनय छान आहे. त्यांनी भूमिकेला योग्य प्रकारे न्याय दिलाय. तसेच विक्रांत, दिव्या दत्ता, अदिल हुसेन आणि अरिफ झकारिया यांनी उत्तम अभिनय करत या चित्रपटाला चार चाँद लावलेत.
संगीत आणि बरंच काही
या चित्रपटात अमित त्रिवेदी याने सुंदर संगीत दिलंय. यातील सावर लू हे गाणे चित्रपट प्रसारित होण्यापूर्वीच हीट ठरले आहे. मोन्ता रे, शिकांयते, ही गाणी फारच सुंदर आणि गुणगुणावीशी वाटणारी अशी आहेत. चित्रपटात भावनिक गुंफण फारच उत्तम रितीने केलीय.
का पाहावा चित्रपट
एक सुंदर कथा, वैशिष्ट्यपूर्ण मांडणी, प्रेमाचा शिडकाव करणारी अशी ही सुंदर कथा पाहण्यास काही हरकत नाही.प्रेमाचा वेगळा रंग अनुभवायचा असल्यास जरुर पाहा.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.